काही काही स्तोत्रे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेली आहेत. ही यादी उघडा आणि आपल्या आवडीच्या स्तोत्रावर क्लिक करून त्यातील नादमाधुर्याचा आनंद घ्या !
दिव्याची वात आणि ज्योत ह्यांच्या नात्यासारखं तिन्हीसांजेचं आणि 'शुभंकरोती'चं नातं अतूट आहे आणि पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या संस्कारक्षम कुटुंबांनी ते टिकवलंय. उत्तम संस्कारांचं बाळकडू पिऊन मंगलमय प्रकाशात आयुष्याची वाटचाल करणारी संस्कारित पिढी आणि योग्य दिशा न सापडल्याने अंधःकारात चाचपडणारी संस्कारहीन पिढी, हे दोन्ही प्रकार आपण अवतीभोवती पाहतो. शरीर निरोगी राहण्यासाठी पौष्टिक खाद्य अनेक ठिकाणी मिळू शकते पण मन-बुद्धी निरोगी राहण्यासाठी उत्तम पौष्टिक संस्कार फक्त कुटुंबातच मिळतात. शुद्ध हवेइतकेच निर्मळ संस्करपण महत्वाचे. बिकट प्रसंगामधे, असहाय स्थितीत संस्कारांचा वारा मनाच्या जहाजाला इकडेतिकडे भरकटू देत नाही, इतकंच नाही तर भ्रांत दिशाहीन मनाला योग्य दिशा दाखवतो. संस्कार हा अंधविश्वासाचा भाग नाही. आपल्या संस्कृतीमधला प्रत्येक संस्कार हा शास्त्राच्या पायावर आधारित आहे.
दिवेलागणीला म्हटले जाणारे शुभंकरोती आणि नित्य प्रार्थना हा असाच एक पावन संस्कार ! सृष्टीमधला तेजोदीप अस्ताला गेल्यानंतर घराघरात दिवे आणि उदबत्ती लावण्याची ही मंगल वेळ. पक्ष्यांना बोलकं करणारी आणि माणसांना अंतर्मुख करणारी ही संध्याकाळ उंबरठा ओलांडून घराघरात आणि मनामनात शिरते ते प्रार्थनेचं अर्घ्य अर्पण करण्याची प्रेरणा घेऊनच. धूसर संधिप्रकाश लयाला जाऊन तमाचं साम्राज्य सर्वदूर पसरू लागतं आणि श्रांत, शांत मनामधे मायेच्या अंधःकारात हरवलेला आत्मा दिव्याच्या चिमुकल्या ज्योतीच्या प्रकाशात परमात्म्याला न्याहाळू लागतो. दीपज्योती हे आत्मज्योतीचं प्रतीक. हे तेज मनात साठवायचं, हिणकस ते जाळण्यासाठी आणि सकस ते उजळवण्यासाठी. हा हेतू मनात बाळगून तोंडावाटे बाहेर पडलेले शब्द म्हणजेच प्रार्थना. कुठल्या का भाषेत असेना मग ती. भगवंताला भाषेचं वावडं नसावं ! इडापीडा टळून आरोग्य सुखसंपदेची याचना करणारे हे सूर मावळतीच्या रंगामधे आणि अगरबत्तीच्या दरवाळणाऱ्या सुगंधी वलयांमधे मिसळून सर्व घरभर पसरतात आणि घरातलं वातावरण मांगल्याने भरून टाकतात. आपल्या ऋषिमुनी-शास्त्रकारांनी ग्रंथांमधे लिहिलेली अंतरात्म्याला सुखावणारी ती लयबद्ध स्तोत्रे सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव करतात. त्यातून प्रसृत होणाऱ्या कल्याणकारी स्पंदनांचं खतपाणी आपल्या विकसित होणाऱ्या ज्ञानेंद्रियांना घालून मुलं देवघरातून बाहेर पडतात. आता गृहपाठाची वेळ. दप्तरातून वही बाहेर निघणार, आजकाल लॅपटॉप ! ह्या विकसित होत जाणाऱ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातूनच ही पिढी घडत जाणार आहे, काय चांगलं आणि काय वाईट ह्याचा निर्णय घेण्याइतपत परिपक्व होणार आहे. संध्यासमयी लावल्या जाणाऱ्या दिव्याचं आयुष्य केवढं? तर त्यातल्या तेलाएवढं. आपल्या आयुष्याच्या दिव्यातलं तेल संपेपर्यंत आपणदेखील चंदनासारखं झिजत रहावं, कापरासारखं दरवळत रहावं आणि सरतेशेवटी फुलांसारखं समर्पित होऊन जावं. पण हा दिवा विझला तरी संस्कारांचा दिवा वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या तेवत राहतो.
आपल्या शास्त्रकारांनी उत्तमोत्तम श्लोकांची, स्तोत्रांची आणि ग्रंथांची रचना करून ठेवली आहे. समाधीअवस्थेतून स्फुरलेले हे काव्य जेव्हा शास्रशुद्धरीत्या म्हटले जाते तेव्हा ते मनबुद्धीवरच नाही तर शरीराच्या विविध आजारांमधेपण लाभकारी आहे हे आता अनेक संशोधनांतून सिद्ध होत आहे. आपल्या आवडीच्या कोणत्यातरी एक-दोन श्लोकांचे नियमित पठाण करायची सवय लावून घ्यावी. बागेमध्ये तुळस, पारिजातक, मोगरा असतोच, तसे घरोघरी देव्हाऱ्यांमध्ये रामरक्षा, मारुतीस्तोत्र, हरिपाठ, भगवद्गीता इ. पुस्तके असतातच. काही काही बागांमधे वड-पिंपळादी वृक्षपण असतात, तसं काही काही घरांमधे ज्ञानेश्वरी, दासबोध, अभंगांची गाथा हे पण असतात !
'सदा सर्वदा योग्य तुझा घडावा' म्हणून स्वतःसाठी म्हटलेली प्रार्थना जेव्हा 'दुरितांचे तिमिर जावो' पर्यंत येऊन पोहोचते तेव्हा ती विश्वव्यापी होते. ही संस्कारांची लस घरोघरी बालकांपर्यंत पोहोचो, ही मंगल प्रार्थना !
Excellent work
ReplyDelete