Dixit diet

   स्थूलपणा साधारण ३ कारणांनी येतो -

१. तुमच्या गुणसूत्रांनी (genes /DNA) निर्धारित केलेलं तुमचं वजन (प्रत्येकाची शरीररचना कशी असावी ह्याचा code ह्यात असतो, ह्या प्रकारची स्थूलता साधरणतः अगदी बालपणापासूनच आलेली असते.)
२. एखाद्या आजाराचा परिणाम म्हणून वाढलेलं वजन, उदा. हायपोथायरॉईड, PCOD इ.
३. गरजेपेक्षा जास्त आहार व व्यायामाच्या अभावाने वाढलेलं वजन  

   प्रकार कोणताही असो; पोट सुटलं असेल तर स्थूलत्व आहे, हे अगदी डोळे झाकून समजा. कोणतातरी चांगला डाएट करण्याची वेळ आता आलेली आहे! ह्या लेखात वर्णन केलेलया डाएटचे परिणाम मुख्यतः वरीलपैकी नं. २ व ३ ने आलेल्या स्थूलतेमधे अधिक प्रकर्षाने दिसतात.

   "मी किती कमी खाते तरी माझं वजन मेलं कमी होतच नाही!" आपली ही व्यथा जेव्हा तुमच्यापुढे कुणी मांडेल तेव्हा तुम्ही त्यांना असे सांगा,"फक्त आहार कमी करून वजन कमी होतं हे कुणी सांगितलं आपल्याला? त्यामुळे तुमचं म्हणणं खरं आहे पण अंशतःच. प्रयत्न करणं कधीही चांगलंच, पण ते अचूक दिशेने आणि शास्त्रीय सिद्धांतांचा आधार घेऊन केले तर कमी कालावधीत अधिक चांगले आणि अपेक्षित परिणाम मिळतील. "

  अमेरिकेत जेव्हा obesity ची साथ आली तेव्हा विविध प्रकारच्या diet च पण पीक आलं! आपल्याकडेपण आता हे होऊ घातलंय. ज्याला ज्या diet नी फायदा झाला तो इतरांना तोच diet 'सर्वात चांगला' असे सांगत सुटतो. Wait to gain weight हे जेवढं खरं आहे तेवढंच Wait to lose weight हे देखील तितकंच खरं आहे. Diet कुठलाही निवडा, शेवटी तुमची weight loss ची गाडी आहार, व्यायाम, संतुलित दिनचर्या आणि चिकाटी ह्या चार चाकांवरच चालणार. बरं, त्यात तुम्हाला रक्तदाब, मधुमेह ,थायरॉईड वगैरे असेल तर औषध हे पाचवं राखीव चाक. हे सगळं जुळून आलं तर वजन कमी होतंच होतं, कुणाचं पहिल्याच महिन्यापासून होतं, कुणाचं दुसऱ्या महिन्यापासून तर कुणाचं तिसऱ्या तर कुणाचं चवथ्या..

   आता मुख्य प्रश्न आहे diet कुठला निवडायचा? आहारशास्त्रावरची चार पुस्तकं वाचली की तुम्हीपण तुमचा नवा diet तयार करू शकता! स्थूल लोकांच्या पसंतीस उतरलेले (म्हणजे त्यांच्या गळी उतरलेले 😋), स्थूलतेचे भाऊबंद -मधुमेह, ब्लड प्रेशर, थायरॉईड- ह्यांना हद्दपार करणारे आणि घसघशीत परिणाम दाखवून दिलेले आपल्याकडे तीन लोकप्रिय diet आहेत - दिक्षित डाएट, त्रिपाठी डाएट, परांजपे डाएट.

   ह्या तिन्ही आहारांचा तुलनात्मक अभ्यास करूया.

    ◾ १. डाएटचे थोडक्यात वैशिष्ट्य व त्याचा शास्त्रीय आधार

दिक्षित: तुम्हाला जे जे काही खायला आवडतं (वडा-गुलाबजामपासून पिझ्झा-आईसक्रीम-चायनीज च्याऊ-म्याऊ पर्यंत सगळं!!) ते दिवसातून फक्त दोनदाच खायचं! जेवण ५५ मिनिटांत आटोपलं पाहिजे . खाण्याच्या वेळा: सकाळी ९-१२ आणि संध्याकाळी ६-९. गोडाचा अतिरेक नको. डॉ. जिचकार ह्यांनी केलेल्या संशोधनानुसार आपण जेवढ्या कमी वेळेला खाऊ तेवढे कमी insulin शरीर तयार करते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चरबीत रूपांतर कमीत कमी प्रमाणात होते.


त्रिपाठी: दुधापासून आणि मैद्यापासून बनवलेले सर्व पदार्थ बंद. जेवढे जास्त नैसर्गिक आणि कमीत कमी शिजवलेले खाल तेवढे श्रेयस्कर. आपले शरीर निसर्गाने बनवलेले आहे त्यामुळे त्याला कृत्रिम रसायनांच्या संपर्कात न आलेले नैसर्गिक पदार्थच अधिक प्रमाणात देणं इष्ट.


परांजपे: 'भूक लागल्याशिवाय खायचे नाही' हा ह्या डाएट पद्धतीचा सुवर्ण नियम (golden rule) आहे, मग तुमच्या समोर कितीही का आवडीचा वा पौष्टिक पदार्थ असेना. भूक नसताना खाल्लेले अन्न विषासारखे काम करते आणि भूक असताना खाल्लेले अन्न अमृतासारखे काम करते. निसर्गातील पशु-पक्ष्यांमध्ये स्थूलता आढळते का? त्याचे कारण, ते कुणीही न सांगता परांजपे डाएटचे अनुसरण करत असतात!

    ◾ २. दिवसातून किती वेळा खायला परवानगी

दिक्षित: फक्त दोनदाच!

त्रिपाठी: तसे काही नाही.


परांजपे: चार वेळेला, त्यापैकी दोन पूर्ण पोटभरून. 

   आपल्याकडे एक म्हण आहे - एकदा खातो तो योगी, दोनदा खातो तो भोगी आणि अधिक वेळेला खाणारा तो रोगी. म्हणजे, जिभेवर ताबा ठेवणे म्हणजे कुठल्याही योगाभ्यासापेक्षा कमी नाही!



Click Here: Visit Once!

    ◾ ३. दूध

दिक्षित: चालेल 


त्रिपाठी: पूर्ण बंद. डॉ. त्रिपाठींच्या मते, आजकाल आपण जे दूध पितो त्यात इस्ट्रोजेन हार्मोन व पेस्टीसाईडचे प्रमाण घातक प्रमाणापेक्षा कित्येक पटीने जास्त असते ज्यामुळे शरीराला फायदा होण्याच्या ऐवजी हानीच जास्त होते. असे दूध न पिणेच जास्त योग्य. अधिक माहितीसाठी काय पिताय - दूध, पांढरे पाणी की विष हा लेख अवश्य वाचावा.


परांजपे: A2 गायीचे दूध मिळाले तर अवश्य घ्या.

    ◾ ४. गोड/ तळलेले पदार्थ

दिक्षित: खा!


त्रिपाठी: गोड पदार्थ व तळलेले पदार्थ आपले रक्त आम्लयुक्त बनवतात, त्यामुळे ते कमीत कमी खा. सुकामेवा, तेलबिया भिजवून मग खा. 


परांजपे: जीभ स्वस्थ बसू देणार नाही, त्यामुळे प्रमाणातच खा आणि त्याचे दुष्परिणाम balance करण्यासाठी इतर पौष्टिक घटक अवश्य खा. दुपारी पक्वान्नाचे जेवण झाले असेल तर संध्याकाळी फक्त सॅलड वा फळे खा, जेवण नको.

    ◾ ५. दिवसातले पहिले पेय

दिक्षित: पाणी, ग्रीन टी!


त्रिपाठी: स्मूदी - हे त्रिपाठी डिएटचे वैशिष्ट्य आहे. एक ग्लास स्मूदीमध्ये १ पालेभाजी, २ प्रकारची फळे, विड्याचे पान, कडीपत्ता, तुळस, पुदिना, लिंबू, सैंधव, हळद, आलं व पाणी हे घटक असतात.


परांजपे: रक्त शुद्धीकरण पेयाने. ह्यामध्ये कोमट पाणी + मध/ १/४ लिंबू/ आवळा पावडर/ सुंठ/ कडुलिंबाचा रस/ जांभूळ बियांची पावडर/ गोमूत्र / गव्हांकुर रस ह्यापैकी कोणताही एक घटक असतो. हे काही दिवस घेतल्यावर चहा पिण्याची इच्छा हळुहळू आपोआपच कमी होऊन जाते असा अनेकांचा अनुभव आहे.

   एक वैशिष्ट्य म्हणजे चहा-कॉफीला ह्या तिन्ही डाएटमध्ये परवानगी नाही!

    ◾ ६. जेवणातील घटक पदार्थ

दिक्षित: तुमच्या आवडीचे सर्व! पण गोड जरा बेताने....

त्रिपाठी: ३०% भाग पोळी/ भाकरी, २०% भाग वरण, २५% शिजवलेल्या भाज्या आणि २५% कोशिंबीर. संध्याकाळी ब्राऊन राईस (unpolished rice)ची खिचडी अधूनमधून खायला हरकत नाही. संध्याकाळचे जेवण झोपेच्या ३ तास अगोदर संपवायचे. 


परांजपे: भूक असेल तरच जेवायला बसा, अन्यथा काही खाऊ नका. जेवणाच्या सुरवातीला एक बाउल (वाटी) कोशिंबीर खा. तुमच्या चवीनुसार अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, दही, शेंगदाणा कूट, सुकामेवा, मध इ. वापरून चविष्ट कोशिंबिरी तुम्ही बनवू शकता. हे सलाड खाऊन झाले कि मग तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ तुम्ही खा, पण ते पण अगदी पोटाला तडस लागेपर्यंत नाही. जेवणानंतर जडपणा आला याचा अर्थ जास्त खाल्ले गेले आहे. त्यात परत संध्याकाळच्या जेवणाची वेळ किती असावी ते सभोवताली निसर्गातील जीवांकडे एक नजर टाकली म्हणजे आपल्याला सहजच कळून येईल!


आम्लपित्तावर (acidity) काही उपाय आहे का?
  आहे तर! करून बघा आणि बोला!
 डाएट चालू केल्यानंतर बऱ्याच जणांना आम्लपित्ताचा (acidity) त्रास चालू होतो, कारण वर्षानुवर्षे रक्तात साचलेले आम्ल बाहेर येऊ लागते. ह्यावर एक साधा पण प्रभावी उपाय आहे. रात्री साधारण एक ग्लासभर पाण्यात पाव चमचा धणे व पाव चमचा जिरे भिजत टाकावेत. सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे व त्यात लिंबाचे किंवा ऍपल सायडर व्हिनेगरचे (apple cider vinegar) ५-६ थेम्ब (जास्त नाही) टाकावेत आणि ते पाणी पिऊन घ्यावे. त्यानंतर २-३ तास काही खाऊ-पिऊ नये. तुमच्या लक्षात येईल की एका आठवड्यातच तुमची acidity ९०% कमी झालेली आहे. आता तुमची acidityची रोजची गोळी बंद करायला हरकत नाही. उपाय चालू ठेवावा. आणखी ८-१० दिवसात तुमची acidity कायमची जाईल.

    ◾ ७. 'मधल्या' वेळेत खायचे पदार्थ

दिक्षित: पातळ ताक, ग्रीन टी, नारळ पाणी, काकडी (ह्या पदार्थांमुळे रक्ताच्या insulin level मध्ये काही फरक पडत नाही)

त्रिपाठी: कमीत कमी तेलाचा नाश्ता - थालीपीठ, डोसा, शिजवलेले मूग, मटकी इ.


परांजपे: तुमचे काम शारीरिक स्वरूपाचे नसेल तर तुम्हाला नाश्त्याची मुळी गरजच नाही आणि नाश्ता केला नाही तर गळल्यासारखे वाटेल व थकवा येईल असे वाटत असेल तर हा सर्वात मोठा गैरसमज आहे. प्रयोग करून बघा, उलट जास्त तरतरीत वाटेल! पण, जर तुमचे काम शारीरिक (physical) स्वरूपाचे असेल, तर stamina टिकवून ठेवणारे खालील पदार्थ खा-
सकाळी: राजगिरा लाडू, नाचणी सत्त्व, मोड आलेले मूग, लाह्या, भिजवलेला सुकामेवा, खजूर, शिकरण इ.
दुपारी: फळे खा (जूस नाही!)

    ◾ ८. काय काय खाणे पूर्ण बंद

दिक्षित: सगळं चालेल!

त्रिपाठी: दूध आणि दुधाचे सर्व पदार्थ, चहा-कॉफी, सर्व प्रकारचे नॉनव्हेज, अल्कोहोल, मैद्याचे पदार्थ


परांजपे: कृत्रिम रसायने (preservatives) टाकून बनवलेले/ टिकवले पदार्थ, मासे सोडून सर्व मांसाहार, अल्कोहोल, सॉफ्ट ड्रिंक्स


    ◾ ९. किती जलद फरक जाणवतो?

दिक्षित: संथ, २-३ महिन्यानंतर

त्रिपाठी: अति जलद, पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापासूनच 


परांजपे: मध्यम गतीने, १-२ महिन्यानंतर

    ◾ १०. गळतीचे प्रमाण*

दिक्षित: २ महिन्यात ७०%

त्रिपाठी: १ महिन्यात ७०%


परांजपे: ३ महिन्यात ७०%


हे प्रमाण प्रत्येक ग्रुप, सोसायटी, मंडळात वेगवेगळे असू शकते.

    ◾ ११. व्यायाम

दिक्षित: रोज ४० मिनिटे चालायचे 

त्रिपाठी: सांधेदुखी नसेल तर अगदी धाप लागेपर्यंत व्यायाम करा 


परांजपे: stretching, aerobics, cycling, swimming, मैदानी खेळ ... जे आवडेल ते करा, पण नक्की करा.

   वजन कमी करणारी जगातील कोणतीही आहारपद्धती असो, शारीरिक व्यायाम हा त्याचा अविभाज्य घटक असतो, ह्याबाबत जगातील सर्व तज्ज्ञांचे एकमत आहे. कोणत्या प्रकारच्या व्यायामाने किती जलद चरबी कमी होते ह्याचे शास्त्रीय विवेचन हवे असल्यास Calorie Count, Calorie Balance and Calorie Budget हा लेख अवश्य वाचा.

Treadmill at home

    ◾ १२. किती खर्चिक

दिक्षित: नाही 

त्रिपाठी: बऱ्यापैकी खर्चिक 


परांजपे: काही प्रमाणात

    ◾ १३. दैनंदिन जीवनातील ताण-तणावाशी सामना

   मानवी मन हा मनुष्य प्राण्याचा अविभाज्य भाग असल्याने मनाचा 'आहार' हा शरीराच्या आहाराइतकाच महत्त्वाचा.

दिक्षित: वजन कमी होण्याची प्रक्रिया ही सावकाश होते, त्यामुळे मनावरचा संयम, धीर आणि प्रतीक्षा आवश्यक.


त्रिपाठी: जीवनातील नकारात्मक बाजूकडे (अहंकार, चिंता, भीती, नैराश्य, हेवेदावे, द्वेष इ.) दुर्लक्ष करून सकारात्मक गोष्टींकडे (आनंद, प्रेम, सुख, शांती, धैर्य, प्रसन्नता इ.) मनाचा कल ठेवणे.


परांजपे: नियमित ध्यानधारणा, संपूर्ण जगाचे भले चिंतून समस्त विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे.

   आता तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी कोणता डाएट सर्वात चांगला ते!

   कमीत कमी परिश्रम घेऊन जास्तीत जास्त वेट लॉस करून देणारा डाएट कोणता?

   आजपर्यंत जगात जे जे डाएट वापरून झालेत, त्या सर्वांमधे कमीत कमी दिवसांमध्ये वा कमीत कमी परिश्रम करून जास्तीत जास्त वजन कमी करून देण्याचे श्रेय GM Diet ह्या डाएटला जाते. GM Diet चे अनुसरण करणाऱ्यांचा बराच मोठा संप्रदाय अमेरिकेत व भारतात आहे. GM Diet बद्दल अधिक माहिती पुढील लेखात.

    ◾ वजन कमी करण्याचे फायदे:

१. शरीर सुडौल दिसते, बांधा सुगठीत होतो.
२. दिवसभर कसं हलकं हलकं वाटतं, आत्मविश्वास तुम्हाला एका नव्या पातळीवर घेऊन जातो.
३. कामातली एकाग्रता आणि efficiency २५ ते ५०% वाढते.
४. जुने आजार (chronic diseases) शरीरातून एकेक करून पळ काढतात.
५. तुमच्या डॉक्टरांशी तुमचे संबंध सुधारतात! 😁
६. तुम्ही two wheeler वापरात असाल तर तिचे average वाढते, तिला कमी वजन वाहावे लागते ना! 😅
   ह्याशिवाय आणखी काही फायदे तुमच्या लक्षात आले असले तर ते तुम्ही लिहून कळवा!