दुसऱ्यांची पत्रे वाचू नये असे म्हणतात, म्हणणाऱ्यांना म्हणू द्या, पण ही पत्रे वाचायचा आणि इतरांना ती दाखवायचा मोह काही आवरत नाही. जिथे लोभ असतो तिथे मोह असायचाच !

  पु. ल. आणि लता. एक शब्दांनी खिळवून ठेवणारा तर दुसरा(री) स्वरांनी आणि सुरांनी. एकाचा विषय बुद्धीचा तर दुसऱ्याचा हृदयाचा. देवी सरस्वतीचा वरदहस्त दोघांनाही भरभरून लाभलाय आणि त्याच्या कृपाप्रसादाचे आपण सर्वांनी आकंठ रसपान केलेलं आहे. ह्या दोघांच्या निम्नलिखित पत्रव्यवहारात झालेली विचारांची देवाण-घेवाण म्हणजे मराठी वाचकांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरावी.

  दि. १६ जून १९७९ रोजी लताबाईंनी पु. ल. ना लंडनहून पाठवलेले पत्र:

   ती. प्रिय पी. एल.
         चरणस्पर्श !

   तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे इथे आल्याबरोबर पत्र लिहायला हवे होते, पण १२ तारखेपर्यंत सारखी धावपळ चालू होती. १२ ला अल्बर्ट हॉलमध्ये The Wren Orchestra बरोबर कार्यक्रम होता. तुमच्या आशीर्वादाने कार्यक्रम चांगला झाला. चांगला म्हणजे लोकांना आवडला. या कार्यक्रमाची तिकिटे खूप लोकांना मिळाली नाहीत. त्यामुळे ३ जुलैला आणखी एक कार्यक्रम ठेवला आहे. उद्या Palladium मध्ये कार्यक्रम आहे. यात एकच गोष्ट समाधानाची - म्हणजे माझी प्रकृती बरी आहे. तुमची तब्येत अलीकडे बरी नसते, त्यामुळे का कुणास पण मला खूप काळजी वाटते. तुमच्यासारख्या माणसांना कधीही काहीही त्रास होऊ नये असे मनापासून वाटते. तुम्ही कुठेही असलात आणि मजेत आहात असे नुसते कळले तरी बरे वाटते.

  आता तुमची प्रकृती कशी आहे ? कळवाल का ? जुलै ११ पर्यंत मी लंडनमध्येच आहे. सौ. वहिनी बऱ्या आहेत ना? त्यांना माझा नमस्कार ! तुम्हाला पत्र लिहिताना फार भीती वाटते, कारण माझे मराठी जरा गडबडच आहे.

  तब्येतीची खूप काळजी घ्यावी.

  नमस्कार.

    तुमची,
    लता
    १६.६.१९७९


  स्व. पु. ल. नी आपल्या नेहमीच्या खुसखुशीत शैलीत लताबाईंच्या पत्राला दिलेले उत्तर:

     प्रिय लता,

     तुझ्या इतक्या गडबडीच्या कार्यक्रमात आठवण ठेऊन पत्र पाठवल्याबद्दल मनापासून आभार. तुला सायनसचा त्रास होत असल्याचे तू सांगितल्यामुळे मला काळजी वाटत होती. गाणाऱ्यांचे आणि नाटकात काम करणाऱ्यांचे शरीर हेच वाद्य असल्यामुळे ते नादुरुस्त राहूं चालत नाही. एवढेच नव्हे तर चार माणसांसारखी ह्या कलावंताची प्रकृती आज ठीक नसेल असा विचार करायला प्रेक्षकही तयार नसतात. काही वर्षांपूर्वी 'बटाट्याच्या चाळी'चा प्रयोग करीत असताना अचानक माझी पाठ धरली. ताशा परिस्थितीत प्रयोग रेटला. लोक त्यातल्या विनोदाला हसत होते आणि मी मात्र मनात,"लेको, तुम्हाला हसायला काय होते? माझे इथे काय हाल चालले आहेत ते माझे मला ठाऊक!" म्हणत होतो. सीक लीव्ह वगैरे सोयी कलावंतांना नसतात.

  तुझ्या सायनसने इंग्लंडच्या हवेत पळ काढला, हे वाचून मला खूप समाधान वाटले. तुझा कार्यक्रम चांगला झाला हे लिहिण्याची गरजच नाही. 'कार्यक्रम झाला' याचा अर्थच चांगला झाला.

  माझी प्रकृती ठीक आहे. गुडघ्याचा संधिवात हे देखील कलावंतासारखे लहरी दुखणे आहे असे मला वाटायला लागले आहे, विशेषतः साथीदार कलावंतासारखे. एखादे दिवशी माझे गुडघे अगसी मोकळेपणाने वागतात, तर कधी कधी एकाएकी निष्कारण आखडूपणा करायला लागतात. त्यांचे कधी काय बिनसते तेच कळत नाही. परवाच एक डॉक्टर आपण ऑपरेशन करून बघू म्हणाले ! डॉक्टरांची बघण्याची हौस भागवण्याची जबाबदारी माझ्या अंगावर घ्यायची माझी इच्छा नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. मला या सर्जन लोकांच्या 'ओपन करून बघू' या वाक्याची नेहमीच गंमत वाटते. नुसते उघडून बघायला आपले शरीर काय मोफत वाचनालयातल्या टेबलवर पडलेलं मासिक वगैरे आहे असे त्यांना वाटते की काय? जाऊ दे !

  तुझ्या पत्रातला Albert Hall, Palladium वगैरेचा उल्लेख वाचून पुन्हा एकदा इंग्लडला जाण्याची माझी इच्छा बळावली. त्या देशात मी सात-आठ महिने काढले आहेत. जगातल्या बऱ्याच देशांत जायची संधी मला मिळाली.

  मला इंग्लंड तर फार आवडतो. तसे प्रत्येक देशाचे आपापले वैशिष्ट्य आहे. जपान सुंदर आहे. इटली सुंदर आहे. पॅरिस किती छान आहे. पण भाषेच्या अडचणीमुळे तिथे अडाण्यासारखे वाटते. लंडनला मी पहिल्या दिवशीदेखील गिरगावात हिंडल्याच्या सहजतेने हिंडू लागलो. भाषा आली नाही की सर्दीने नाक चोंदल्याच्या अवस्थेत अत्तराच्या दुकानात गेल्यासारखे वाटते. इंग्रज तसा अबोल आहे, पण चतुराईने त्याच्या गळ्यातल्या टायची गाठ जरा सैल केली की गप्पागोष्टीत मस्त रंगतो. अर्थात आता लंडनचाही भेंडीबाजार झाला आहे. त्यामुळे आणि जगातल्या एकूणच सगळ्या महानगरांतून स्कायस्क्रॅपर संस्कृती आल्यामुळे लंडन-न्यूयॉर्क-टोकियो वगैरे इरॉस सिनेमापलीकडच्या मुंबईसारखीच झाली आहेत, हा भाग निराळा, पण इंग्लंडचा ग्रामीण विभाग अजूनही सुंदर आहे. तू शेक्सपिअरचे स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन हे गांव पाहिलंस का? जरूर पहा. तिथे दरवर्षी शेक्सपिअरच्या नाटकांचा उत्सव चालू असतो. तिथल्या रंगमंदिरात शेक्सपिअरची नाटकं पहा. एव्हन नदीकाठच्या त्या गावात नुसते हिंडत राहणे हादेखील अपूर्व आनंद आहे. ज्या कलावंतांनी, साहित्यिकांनी मनुष्यसमाजाला आनंद दिला त्याची शतका-शतकापूर्वीची राहती घरे ही माणसं किती काळजीपूर्वक जातं करून ठेवतात पहा. माणसातल्या कृतज्ञतेचे आणि त्यातूनच दिसणाऱ्या मनाच्या श्रीमंतीचे हे द्योतक आहे. नाहीतर आपण लोक ! छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा आपण टिकवून धरू शकलो नाही, तिथे इतरांची काय कथा?

  - सुनीतीने तुला केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन आशीर्वाद सांगितले आहेत.

  तुझा...
  पी. एल.

  ता.क. - तू मायन्यात 'चरणस्पर्श' केल्यामुळे मी चाट झालो. तू वयाने लहान असल्यामुळे तुला मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही आणि तुझ्या लक्षावधी गीतांतल्या एकाही गीतातल्या चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे ! पूर्वीचे राजे मुलूख पादाक्रांत करायचे , तू सारे जग 'पदाक्रांत' केलं आहेस, हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको, ही शुभेच्छा !

(स्व. पु. ल. देशपांडे यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांना दिलेले पत्रोत्तर)

 ■ वाचा : वेचक आणि वेधक : पु. ल. आणि व. पु.

 ■ वाचा : दिक्षित डाएट, त्रिपाठी डाएट, परांजपे डाएट - तुमच्यासाठी कोणता चांगला?