हे प्रकरण वाचल्यानंतर पृथ्वीवरील सर्वात समृद्ध भाषा कोणती, सर्वात प्रतिभाशाली कवी कोणत्या देशात झाले किंवा मानवी बुद्धीला स्तंभित करणारा सर्वात अलौकिक काव्याविष्कार कोणता, ह्यासारखे प्रश्नच तुम्हाला राहणार नाहीत. वाचा तर!
१७ व्या शतकात वेंकटाध्वरिने रचलेले 'राघवयादवीयम्' हे संस्कृत काव्य म्हणजे असामान्य वाङ्मयीन प्रतिभेचा एक अद्वितीय अविष्कार. केवळ ३० श्लोकांचे हे काव्य; पण ह्या काव्यातील एकेक श्लोक म्हणजे काव्यप्रेमींना स्तंभित करून सोडणारं एकेक अनमोल रत्नच आहे. ह्यातील प्रत्येक श्लोक सामान्य क्रमाने वाचल्यास साकारतो रामकथेतील एक प्रसंग आणि उलट क्रमाने वाचल्यास होतो कृष्णकथेतील एक प्रसंग! काव्याला सरळ क्रमाने वाचण्याला संस्कृतात म्हणतात अनुलोम आणि उलट क्रमाने वाचण्याचा म्हणतात विलोम. ह्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अनुलोम रूपात जी क्रिया अथवा जो भाव प्रदर्शित झालेला आहे, काहीशी तशीच क्रिया व तसाच भाव विलोम रूपात देखील व्यक्त झालेला आपल्याला दिसेल. ह्या दोन्ही आवर्तनातील श्लोक व त्याचा मराठी अनुवाद खाली दिलेला आहे, त्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा!
वेंकटाध्वरिच्या प्रतिभेच्या तोडीचं काव्य दुसऱ्या कुठल्या भाषेत आणखी असेल की नाही, हे सांगणं फार अवघड आहे. 'राघवयादवीयम्' हे नाव वाचल्यावर सर्वसाधारण वाचकाला असा बोध होईल की ह्यामध्ये रामराज्यातील कुठल्यातरी यादवीचे वर्णन असावे, परंतु वस्तुतः बघायला मिळते ती भगवान श्रीकृष्ण व प्रभू श्रीरामचंद्र या दोन पूर्णावतारांच्या दैवी कथांची एक सुंदर गुंफण!
लक्षावधी काव्यप्रेमींपासून वर्षानुवर्षे अलक्षित राहिलेल्या काव्य-सारस्वतातील वेंकटाध्वरि नामक एका तेजस्वी ताऱ्याला जनसामान्यांपर्यंत आणण्याचा हा एक लुकलुकता प्रयत्न!
अनुलोम : रामकथा | विलोम : कृष्णकथा |
---|---|
वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः । रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥१॥ मी त्या प्रभू रामचंद्रांच्या चरणांना वंदन करतो ज्यांनी आपली भार्या सीतेच्या शोधार्थ मलय आणि सह्याद्री पर्वतांच्या पलीकडे असलेल्या लंकेत जाऊन रावणाचा वध केला आणि परत येऊन दीर्घ काळ सीतेसह दीर्घकाळ वैभवात राज्यकारभार केला. | सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः । यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥१॥ मी तपस्वी व त्यागी, रुक्मिणी आणि गोपींसह क्रीडा करणाऱ्या, ज्याच्या हृदयात माता लक्ष्मी विराजमान आहे आणि जो शुभ्र आभूषणांनी मंडित आहे अशा गोपीपूजित भगवान श्रीकृष्णाच्या चरणांना वंदन करतो. |
साकेताख्या ज्यायामासीत् या विप्रादीप्ता आर्याधारा। पूः आजीत अदेवाद्याविश्वासा अग्र्या सावाशारावा ॥ २॥ पृथ्वीवरील सर्वोत्तम शहरांपैकी एक अयोध्या नामक एक शहर होते जे वैदिक ब्राह्मण व वाणिकांसाठी प्रसिद्ध होते, अजपुत्र दशरथाचे ते धाम होते, जेथे देव सदा यज्ञात केले गेलेले दान स्वीकारण्यास आतुर असत. | वाराशावासाग्र्या साश्वाविद्यावादेताजीरा पूः। राधार्यप्ता दीप्रा विद्यासीमा या ज्याख्याता के सा ॥ २॥ समुद्राच्या मध्यात स्थित, विश्वातील प्रसिद्ध शहरांमधील द्वारका हे एक असे शहर होते जिथे असंख्य हत्ती होते, अनेक विद्वानांच्या वादविवादांच्या प्रतियोगिता तेथे चालत, जे राधावल्लभ श्रीकृष्णाचे निवासस्थान होते आणि आध्यात्मिक ज्ञानाचे ते एक प्रसिद्ध केंद्र होते. |
कामभारस्स्थलसारश्रीसौधासौ घनवापिका । सारसारवपीना सरागाकारसुभूरुभूः ॥ ३॥ सर्वकामनापूर्तीकाराक, प्रचूर प्रासादयुक्त, असंख्य धनिकांचे निवासस्थान, सारस पक्ष्यांच्या कूजनाने गुंजित, सखोल विहिरींनी युक्त अशी ही अयोध्यानामक सुवर्णनगरी होती. | भूरिभूसुरकागारासना पीवरसारसा । का अपि व अनघसौध असौ श्रीरसालस्थभामका ॥ ३॥ असंख्य निर्मल भवन आणि कमलमंडीत, जेथे वेदींभोवती समूहाने ब्राह्मण विद्यमान असतात (अशा या नगरीत) आम्रवृक्षांमधून सूर्याची किरणे प्रकाशित होत असतात. |
रामधाम समानेनम् आगोरोधनम् आस ताम्। नामहाम् अक्षररसं ताराभाः तु न वेद या ॥ ४॥ समस्तपपनाशक प्रभू श्रीरामचंद्राच्या दिव्य आभेने हे शहर आलोकित असे, ज्यापुढे ताऱ्यांचाही प्रकाश फिका पडत असे. अनंत सुखाचें स्रोत असलेल्या या शहरात उत्सवांची काहीच कमतरता नव्हती. | यादवेनः तु भाराता संररक्ष महामनाः। तां सः मानधरः गोमान् अनेमासमधामराः ॥ ४॥ परम तेजस्वी, नम्र, दयाळू, अतुल शक्तिशाली, गोस्वामी भगवान श्रीकृष्णांकडून द्वारकानगरीचे रक्षण सुचारूपणे केले जात असे. |
यन् गाधेयः योगी रागी वैताने सौम्ये सौख्ये असौ। तं ख्यातं शीतं स्फीतं भीमान् आम अश्रीहाता त्रातम् ॥ ५॥ गाधीपुत्र ऋषि विश्वामित्र, एक निर्विघ्न, सुखी, आनंददायी यज्ञ करू इच्छित होते परंतु (त्या ठिकाणी) आसुरी शक्तींचे प्राबल्य असल्याने त्यांनी सुनिश्चल, धीरगंभीर, महिमाशाली प्रभू श्रीरामचंद्रांचे संरक्षण प्राप्त करून घेतले होते. | तं त्राता हा श्रीमान् आम अभीतं स्फीतं शीतं ख्यातं। सौख्ये सौम्ये असौ नेता वै गीरागी यः योधे गायन ॥ ५॥ एक दयावान, शांत आणि परोपकारी म्हणून ज्यांची ख्याती दिवसेंदिवस पसरत होती अशा नारद मुनींनी देदीप्यमान, योद्ध्यांना (शंखध्वनीद्वारे) स्फूर्ती देणाऱ्या, ब्राह्मणपालक भगवान श्रीकृष्णाकडे विश्वकल्याणासाठी गायनाद्वारे याचना केली. |
मारमं सुकुमाराभं रसाजापनृताश्रितं । काविरामदलाप गोसम अवामतरा नते ॥ ६॥ लक्ष्मीपति नारायणाच्या सुंदर, तेजस्वी अशा या मानवी अवताराचे (रामाचे) वरण अवनीसुता, धरातुल्य धैर्यशील, सत्यवादी, स्निग्ध, निज-शब्द-आनंद-प्रदायिनी सीतेद्वारे केले गेले होते. | तेन रातम् अवाम अस गोपालात् अमराविक। तं श्रित नृपजा सारभं रामा कुसुमं रमा ॥ ६॥ देवतांचे रक्षक, सत्यवचनी श्रीकृष्णाने, ज्यांना नृपजा रुक्मिणीने पतीरूपात प्राप्त करून घेतले होते, नारदांच्या हाती प्राजक्तवृक्षाचे रोपटे पाठवले. |
रामनामा सदा खेदभावे दयावान् अतापीनतेजाः रिपौ आनते। कादिमोदासहाता स्वभासा रसामे सुगः रेणुकागात्रजे भूरुमे ॥ ७॥ दुःखितांप्रति परमदयाळू, सूर्याप्रमाणे तेजस्वी पण सहजप्राप्त, देवतांच्या आनंदात विघ्न आणणाऱ्या दैत्यांचे पारिपत्य करणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी संपूर्ण धरातालावर भ्रमण करणारे, भुलोकविजयी आपले उत्तराधिकारी प्रतिस्पर्धी रेणुकापुत्र परशुराम यांना आपल्या पराक्रमाने पराजित करून स्तब्ध केले. | मेरुभूजेत्रगा काणुरे गोसुमे सा अरसा भास्वता हा सदा मोदिका। तेन वा पारिजातेन पीता नवायादवे भादखेदासमानामरा ॥७॥ मेरू पर्वतापेक्षाही सुंदर आणि दुर्गम अशा रेवंतक पर्वतावर निवास करत असताना रुक्मिणीस, स्वर्णीम सौंदर्याचा पारिजात प्राप्त झाल्यानंतर इतर फुले दुय्यम व निकृष्ट वाटू लागली. दैवी आणि तेजस्वी भगवंताच्या सान्निध्यात ती कृतकृत्य पावत होती. |
सारसासमधात अक्षिभूम्ना धामसु सीतया। साधु असौ इह रेमे क्षेमे अरम् आसुरसारहा ॥ ८॥ समस्त आसुरी सेनेचे निर्दालक, असौम्य (तेजस्वी) नेत्रांनी आपला प्रभाव पाडणारे प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत सीतेसह आनंदाने निवास करीत होते. | हारसारसुमा रम्यक्षेमेर इह विसाध्वसा। य अतसीसुमधाम्ना भूक्षिता धाम ससार सा ॥ ८॥ आपल्या गळ्यात मोत्यांच्या हारांप्रमाणे पारिजातकाची पुष्पमाला धारण केलेली, प्रसन्नता व परोपकाराची अधिष्ठात्री, निर्भय रुक्मिणीस अग्निज्वालेसारखी फुले धारण केलेले श्रीकृष्ण त्वरेने हरण करून आपल्या निजगृही घेऊन गेले. |
सागसा भरताय इभमाभाता मन्युमत्तया। स अत्र मध्यमय तापे पोताय अधिगता रसा ॥ ९॥ मनात पाप भरलेली कैकेयी आपल्या भारतासाठी (राज्य मिळण्यासाठी) पापाग्नीने झुरत होती. लक्ष्मीच्या (सीतेच्या) कांतीने उज्ज्वलित झालेल्या धरतीस (अयोध्येस ) दशरथाच्या त्या मधल्या राणीने शेवटी अनीतीने भरतासाठी मिळवलेच. | सारतागधिया तापोपेता या मध्यमत्रसा। यात्तमन्युमता भामा भयेता रभसागसा ॥ ९॥ अति विदुषी पण अती उतावीळ झालेली नाजूक कटीची सत्यभामा कृष्णाने पारिजातवृक्ष भेदभावपूर्वक रुक्मिणीस दिल्याचे बघून रागाने आणि घृणेने आहतग्रस्त झाली. |
तानवात् अपका उमाभा रामे काननद आस सा। या लता अवृद्धसेवाका कैकेयी महद अहह ॥ १०॥ प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकास विरोध करून त्यांच्या वनवासास कारण झालेली, पीतवर्णी, क्षीणतेमुळे एखाद्या वेलीप्रमाणे खंगलेली, आत्मानंदास मुकलेली कैकेयी, वृद्ध दशरथाच्या सेवेपासूनसुद्धा वंचित झाली. | हह दाहमयी केकैकावासेद्धवृतालया। सा सदाननका आमेरा भामा कोपदवानता ॥ १०॥ सुस्वरूप सत्यभामा, पराकाष्ठेची विचलित व अशांत होऊन, दावाग्निप्रमाणे क्रोधित होऊन, मोरांचे क्रीडास्थान असलेल्या आपल्या प्रासादांचे दरवाजे बंद करून बसली, त्यामुळे तिच्या दासीपण आत येऊ शकेनात. |
वरमानदसत्यासह्रीतपित्रादरात् अहो। भास्वरः स्थिरधीरः अपहारोराः वनगामी असौ ॥ ११॥ विनम्र, तेजोमय, मुक्ताहारधारी, वीर, साहसी आणि परम आदरणीय प्रभू श्रीरामचंद्र सत्याचा त्याग करून (कैकेयीस) दिलेल्या वचनाचे पालन करून लज्जित झालेल्या आपल्या पित्याच्या सम्मानार्थ वनात प्रस्थान करते झाले. | सौम्यगानवरारोहापरः धीरः स्स्थिरस्वभाः। हो दरात् अत्र आपितह्री सत्यासदनम् आर वा ॥ ११॥ काहीसे भय आणि काहीसा खेद (अशा द्विधा) मनोवृत्तींमध्ये सापडलेले वीर, दृढ़चित्त आणि सत्यभामाच्या काळजीने ग्रस्त भगवान श्रीकृष्ण तिच्या महालात जाऊन पोचले. |
या नयानघधीतादा रसायाः तनया दवे। सा गता हि वियाता ह्रीसतापा न किल ऊनाभा ॥ १२॥ शरणागतास शास्त्रोचित सद्बुद्धि देणारी धरतीकन्या सीतादेखील, ह्या लज्जास्पद घटनेच्या आघातामुळे जिच्या कांतीमध्ये तसूभरही न्यूनता आली नाही, वनगमन करती झाली. | भान् अलोकि न पाता सः ह्रीता या विहितागसा। वेदयानः तया सारदात धीघनया अनया ॥ १२॥ गरुडवाहनधारी, वैभव प्रदान करणाऱ्या, भक्तरक्षक, तेजस्वी अशा भगवान श्रीकृष्णांकडे परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालेले असूनसुद्धा लज्जेने व अपमानाने चूर झालेल्या सत्यभामाने बघितलेसुद्धा नाही. |
रागिराधुतिगर्वादारदाहः महसा हह। यान् अगात भरद्वाजम् आयासी दमगाहिनः ॥ १३॥ तमोगुणी, उपद्रवी, दम्भी, उच्छृंखल शत्रुपक्षास आपल्या तेजाने दहन करणाऱ्या शूरवीर श्रीरामजवळ (राक्षसांच्या त्रासाने) त्राही अन् क्लांत झालेल्या भारद्वाजादी मुनींनी मदतीची याचना केली. | नो हि गाम् अदसीयामाजत् व आरभत गा न या। हह सा आह महोदारदार्वागतिधुरा गिरा ॥ १३॥ पुष्पमालाधारी श्रीकृष्णाच्या शब्दांकडे उदासी सत्यभामेने न कवडीचे ध्यान दिले न काही बोलली. श्रीकृष्ण जोपर्यंत पारिजात वृक्ष आणत नाही तोपर्यंत तिने न बोलण्याचा निश्चयच केला होता. |
यातुराजिदभाभारं द्यां व मारुतगन्धगम्। सः अगम् आर पदं यक्षतुंगाभः अनघयात्रया ॥ १४॥ आपले तेज आणि प्रतापाद्वारे अगणित राक्षसांचा नाश करणारे प्रभू श्रीरामचंद्र स्वर्गीय सुगंधाने पावन झालेल्या चित्रकूटावर यक्षराज कुबेरासम वैभव आणि तेज लेऊन पोचले. | यात्रया घनभः गातुं क्षयदं परमागसः। गन्धगं तरुम् आव द्यां रंभाभादजिरा तु या ॥ १४॥ मेघासामान कांती असलेले भगवान श्रीकृष्ण, मनःस्तापाने ग्रस्त सत्यभामेला शांत करण्याकरिता रंभासदृश परमसुंदर अप्सरा जेथिल अंगणात क्रीडा करतात अशा स्वर्गलोकी पारिजात वृक्ष आणण्याकरिता पोचले. |
दण्डकां प्रदमो राजाल्या हतामयकारिहा। सः समानवतानेनोभोग्याभः न तदा आस न ॥ १५॥ असंख्य (क्षत्रिय) राजांना पराभूत करणाऱ्या (परशुरामाचे) दमन करणारे, मनुष्ययोनीतील पामर जीवांना आपल्या निष्कलंक कीर्तिने आनन्दित करणाऱ्या संयमी श्रीरामांनी चित्रकूटामध्ये प्रवेश केला. | न सदातनभोग्याभः नो नेता वनम् आस सः। हारिकायमताहल्याजारामोदप्रकाण्डदम् ॥ १५॥ नित्य आनंददायी जननायक श्रीकृष्ण नन्दनवनात जाऊन पोचले. ज्या इंद्राने कपटपूर्वक अहिल्येशी प्रियाराधन केले होते त्या इंद्राचे ते सुखोपभोगाचे निवासस्थान होते. |
सः अरम् आरत् अनज्ञाननः वेदेराकण्ठकुंभजम्। तं द्रुसारपटः अनागाः नानादोषविराधहा ॥ १६॥ ज्यांना वेद कंठस्थ आहेत आणि ज्यांची वाणी वेदासमान आहे, अशा कुम्भज (अगस्ती) ऋषिंजवळ भगवान श्रीराम येऊन पोचले. त्यांनी निर्मल अशी वल्कले परिधान केली आहेत, ज्यांनी महापापी विराध राक्षसाचा वध केलेला आहे. | हा धराविषदह नानागानाटोपरसात् द्रुतम्। जम्भकुण्ठकराः देवेनः अज्ञानदरम् आर सः ॥ १६॥ हाय, पृथ्वीला जलप्रदान करणाऱ्या, किन्नरों-गंधर्वांच्या सुरेल संगीताचा आनंद घेणाऱ्या देवाधिपती इंद्राने जम्बासुर संहारकाच्या (श्रीकृष्णाच्या) आगमनाविषयी ऐकले तेव्हा तो एका अज्ञात भयाने ग्रस्त होऊन गेला. |
सागमाकरपाता हाकंकेनावनतः हि सः। न समानर्द मा अरामा लंकाराजस्वसा रतम् ॥ १७॥ वेदांमध्ये निपुण, संतांचे रक्षक प्रभू श्रीरामचंद्रांना गरुडाने वाकून प्रणाम केला, ज्यांच्याप्रती लंकाधिपती रावणाची कर्कशा बहीण शूर्पणखा हिची कामलालसा अधूरीच राहिली होती. | तं रसासु अजराकालं म आरामार्दनम् आस न। स हितः अनवनाकेकं हाता अपारकम् आगसा ॥ १७॥ जरा आणि मृत्यूच्या परे ज्यांचे स्थान आहे असे हे भगवान श्रीकृष्ण समूळ पारिजात वृक्ष आणण्यासाठी जेव्हा स्वर्गात गेले, ते बघून त्यांचा हितचिंतक देवेंद्र दुःखी झाला. |
तां स गोरमदोश्रीदो विग्रामसदरोतत । वैरमासपलाहारा विनासा रविवंशके ॥ १८॥ बंधू लक्ष्मणाच्या उपस्थितीमुळे ज्यांची उजवी बाजू गौरवान्वित झाली आहे, अशा सूर्यवंशी प्रभू श्रीरामचंद्रांप्रती मांसाहारी नासिकाविहीन शूर्पणखेने नाक कापले गेल्यानंतर वैर धारण केले. | केशवं विरसानाविः आह आलापसमारवैः। ततरोदसम् अग्राविदः अश्रीदः अमरगः असताम् ॥ १८॥ उल्हास, जीवनशक्ती आणि तेज यांच्या ऱ्हासाचे भान झाल्याने उन्मत्त झालेल्या पर्वतांना व देवांचे नेतृत्व करताना असुरांना निष्प्रभ करणारा इंद्र, भू व धरा यांची निर्मिती करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना म्हणाला - |
गोद्युगोमः स्वमायः अभूत् अश्रीगखरसेनया। सह साहवधारः अविकलः अराजत् अरातिहा ॥ १९॥ खराच्या सेनेला परास्त केल्यानंतर मृत्युलोक आणि स्वर्गलोकाच्या कानाकोपऱ्यात ज्यांची कीर्ती पोचली आहे अशा प्रभू श्रीरामचंद्राची निडर व शत्रूसंहारक अशी प्रतिमा अधिकच गौरवान्वित झाली. | हा अतिरादजरालोक विरोधावहसाहस। यानसेरखग श्रीद भूयः म स्वम् अगः द्युगः ॥ १९॥ "सर्वकामनापूर्ती करणाऱ्या देवांच्या अहंकाराचे दमन करणाऱ्या, ज्यांचे वाहन वेदात्मा गरुड आहे, वैभव प्रदान करणाऱ्या लक्ष्मीचे पतीस्वरूप, हे भगवन्, हा पारिजात वृक्ष आपण पृथ्वीवर घेऊन जाऊ नका." |
हतपापचये हेयः लंकेशः अयम् असारधीः। रजिराविरतेरापः हा हा अहम् ग्रहम् आर घः ॥ २०॥ नीच आणि विकृत मनोवृत्तीच्या रावणाने, जो नेहेमी मदिरापान करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या असुरांमध्ये वावरतो, क्रूर असुरनाशक प्रभू श्रीरामचंद्रांवर आक्रमण करायचा विचार केला. | घोरम् आह ग्रहं हाहापः अरातेः रविराजिराः। धीरसामयशोकेलं यो हेये च पपात ह ॥ २०॥ सूर्याप्रमाणे उज्ज्वल स्वर्णाभूषण अलंकृत पण कुत्सित बुद्धिने ग्रस्त इंद्राने मनोवेदनेने आक्रंदित होऊन प्रतिस्पर्ध्याच्या सामर्थ्याला विसरून भगवंतांना बंदी बनवण्याचा आदेश दिला. |
ताटकेयलवादत् एनोहारी हारिगिर आस सः। हा असहायजना सीता अनाप्तेना अदमनाः भुवि ॥ २१॥ (हे सीते.. हा मारिचाचा स्वर ऐकून) जे चित्ताकर्षक आहेत, ज्यांच्या वाणीने समस्त पापांचा नाश होतो, तडकापुत्र मारिचाच्या वधाचे कारण होणाऱ्या आपल्या स्वामींचे नाव ऐकून सीता व्यथित झाली. | विभुना मदनाप्तेन आत आसीनाजयहासहा। सः सराः गिरिहारी ह नो देवालयके अटता ॥ २१॥ अनंत ऐश्वर्याचा धनी, मदोन्मत्त पर्वतांचे दमन करणारा, आपला पुत्र जयंत ह्याचा शत्रू प्रद्युम्न याच्या अट्टाहासाला आपल्या बाणवर्षावाने अटकाव करणारा इंद्र, देवलोकात पुत्र प्रद्युम्न ह्याच्यासह देवलोकात संचार करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना मात्र रोखू शकला नाही. |
भारमा कुदशाकेन आशराधीकुहकेन हा। चारुधीवनपालोक्या वैदेही महिता हृता ॥ २२ ॥ नीच कृत्याच्या आहारी जाऊन आपल्या अंतःकाळाच्या समीप जाऊ पाहणाऱ्या रावणाने, मंगल विचार प्रसारित करणाऱ्या वनदेवतांच्या समक्ष, लक्ष्मीसदृश तेजस्वी सीतेचे अपहरण केलेच. | ताः हृताः हि महीदेव ऐक्य अलोपन धीरुचा। हानकेह कुधीराशा नाकेशा अदकुमारभाः ॥ २२॥ अशा प्रसंगी एका ब्राह्मणाशी संगनमत करून, चिरस्थायी ज्ञान व तेजास पुनः प्राप्त करून घेऊन, देवेंद्राने देवांना पलायन करण्यास भाग पाडणाऱ्या प्रद्यम्नाचा प्रताप हरण केला. |
हारितोयदभः रामावियोगे अनघवायुजः। तं रुमामहितः अपेतामोदाः असारज्ञः आम यः ॥ २३॥ सीतेचा वियोग घडल्यानंतर श्रीरामांना अविकारी हनुमंताची सांगत लाभली. रुमापती व रुमेचे श्रद्धास्थान असलेला पण वालीच्या त्रासाने त्रस्त होऊन आपली मनःशांती व विचारशक्ती गमावलेला सुग्रीव प्रभू श्रीरामचंद्रांना शरण गेला. | यः अमराज्ञः असादोमः अतापेतः हिममारुतम्। जः युवा घनगेयः विम् आर आभोदयतः अरिहा ॥ २३॥ तेव्हा देवतांसमक्ष युद्धाचा परित्याग केलेला पराक्रमी प्रद्युम्न अवकाशात वाहणाऱ्या मंद मंद वाऱ्याच्या झुळुकीने पुनर्जीवित होऊन व गुरुजनांचे गुणगान गाऊन पुनः देवतांस परास्त करता झाला. |
भानुभानुतभाः वामा सदामोदपरः हतं। तं ह तामरसाभक्क्षः अतिराता अकृत वासविम् ॥ २४॥ सूर्याकडून ज्याच्या तेजाची स्तुती होते, रमणप्रिय पत्नीस निरंतर आनंद प्रदान करणारे उज्जल-कमल-नयन प्रभू श्रीरामचंद्रांनी इंद्रपुत्र वालीचा संहार केला. | विं सः वातकृतारातिक्षोभासारमताहतं। तं हरोपदमः दासम् आव आभातनुभानुभाः ॥ २४॥ त्या भगवान श्रीकृष्णाने, ज्याने एके काळी शिवाला पराजित केले होते आणि ज्याच्या तेजसमक्ष सूर्यपण गौण आहे, उत्तेजित झालेल्या सेवकाची (गरुडाची) रक्षा केली ज्याने केवळ आपल्या पंखांच्या फडफडाटाने शत्रूची शक्ती आणि गर्वाचा नाश केला होता. |
हंसजारुद्धबलजा परोदारसुभा अजनि। राजि रावण रक्षोरविघाताय रमा आर यम् ॥ २५॥ हंसज अर्थात् सूर्यपुत्र सुग्रीवाच्या अजेय सैन्याच्या प्रमुख भूमिकेमुळे रावणाविरुद्धच्या युद्धात प्रभू श्रीरामचंद्रांना विजयश्री प्राप्त झाली व त्यांच्या गौरवात अधिक वृद्धी झाली. | यं रमा आर यताघ विरक्षोरणवराजिर। निजभा सुरद रोपजालबद्ध रुजासहम् ॥ २५॥ जे बाणांचा वर्षाव झेलण्यास समर्थ आहेत, युद्धभूमीला असुरविहीन केल्याने व देवतांवर विजय प्राप्त केल्याने जे तेजाने अधिकच तळपत आहेत, अशा श्रीकृष्णास विजयश्रीने माळ घातली. |
सागरातिगम् आभातिनाकेशः असुरमासहः। तं सः मारुतजं गोप्ता अभात् आसाद्य गतः अगजम् ॥ २६॥ (पवनवेगाने) सह्याद्रीपासून समुद्र उल्लंघून जाऊ शकणाऱ्या हनुमंताच्या समावेशाने, इंद्रापेक्षाही अधिक प्रतापी, असुरांच्या विस्तारास प्रतिकूल अशा रक्षक श्रीरामाच्या सामर्थ्यात वृद्धी झाली. | जं गतः गदी असादाभाप्ता गोजं तरुम् आस तं। हः समारसुशोकेन अतिभामागतिः आगस ॥ २६॥ प्रद्युम्नास दिलेल्या पीडेने क्रोधीत झालेले गदाधारी, अनंत तेजयमान भगवान श्रीकृष्ण सरतेशेवटी त्या स्वर्गीय वृक्षाला प्राप्त करते झाले. |
वीरवानरसेनस्य त्राताभादवता हि सः । तोयधो अरिगोयादसि अयतः नवसेतुना ॥ २७॥ वीर वानर सेनेचे तारणहार प्रभू श्रीरामचंद्र, समुद्रातील असंख्य प्राण्यांपासून रक्षण करणाऱ्या सेतूवरून (लंकेकडे) प्रस्थान करते झाले. | ना तु सेवनतः यस्य दयागः अरिवधायतः। स हि तावत् अभत त्रासी अनसेः अनवारवी ॥ २७॥ जो व्यक्ती भगवंताच्या सेवेत रत होऊन त्याचे अखंड गुणगान करतो, तो ईश्वराच्या दयेस पात्र होऊन आपल्या रिपूंवर विजय प्राप्त करतो. जो असे करत नाही तो शस्त्र-हीन शत्रुलादेखील भयभीत होऊन पराभूत होतो. |
हारिसाहसलंकेनासुभेदी महितः हि सः। चारुभूतनुजः रामः अरम् आराधयदार्तिहा ॥ २८॥ साहसी प्रभू रामचंद्रांकडून अद्भुत रीतीने रावणाचा वध झालेला पाहून देवतांनी त्यांची स्तुती केली. ते स्वरूपसुंदर भूमिपुत्री सीतेच्या संग असून शरणागतांचे कष्ट निवारण करतात. | हा आर्तिदाय धराम् आर मोराः जः नुतभूः रुचा। सः हितः हि मदीभे सुनाके अलं सहसा अरिहा ॥ २८॥ लक्ष्मीला आपल्या वक्षस्थळी धारण करणारे भगवान श्रीकृष्ण, प्रचूर कीर्तिवान प्रद्युम्नला युद्धातील कष्टांपासून मुक्त करून स्वर्गलोकातील ऐरावताला जिंकून पृथ्वीवर परतले. |
नालिकेर सुभाकारागारा असौ सुरसापिका। रावणारिक्षमेरा पूः आभेजे हि न न अमुना ॥ २९॥ नारळाच्या वृक्षांनी आच्छादित, विविधरंगी भवनांनी निर्मित अयोध्या नगर, रावणास पराजित करणाऱ्या श्रीरामांचे आता सुयोग्य निवासस्थान बनून राहिले. | ना अमुना नहि जेभेर पूः आमे अक्षरिणा वरा। का अपि सारसुसौरागा राकाभासुरकेलिना ॥ २९॥ अनेकानेक विजयी गजराजांच्या समूहात तेजोमय भगवान श्रीकृष्णांचे दिव्य पारिजात वृक्षासह नृत्यरत रमणींच्या वाजतगाजत द्वारका भूमीत मिरवणुकीत आगमन झाले. |
सा अग्र्यतामरसागाराम् अक्षामा घनभा आर गौः। निजदे अपरजिति आस श्रीः रामे सुगराजभा ॥ ३०॥ आपले सर्वस्व पणाला लावून दिग्विजयी बनलेल्या पराक्रमी श्रीरामाच्या अधिपत्यामध्ये उदित समृद्ध अयोध्यानगरी, कमलपुष्प-विराजित लक्ष्मीचे सुयोग्य निवासस्थान बनली. | भा अजराग सुमेरा श्रीसत्याजिरपदे अजनि। गौरभा अनघमा क्षामरागा स अरमत अग्र्यसा ॥ ३०॥ सत्यभामेच्या अंगणातील पारिजातकाला फुले लागली. ही सात्विक स्वर्गीय संपत्ती प्राप्त केलेली सत्यभामा आता श्रीकृष्णाची प्रथम भार्या- रुक्मिणीबद्दल असलेला मत्सर त्यागून श्रीकृष्णासह आनंदात नांदू लागली. |
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊