कुण्या व्यक्तीने आज Whats App वर एक छान कविता पाठवली . ती कविता वाचली आणि बालपणीच्या सुट्टीतल्या सर्व आठवणी नुसत्या जागृतच नाही तर जिवंत होऊनअवती-भोवती पिंगा घालू लागल्या . सुटीत गावी असताना सकाळी सकाळी अंगणात पडणारा सडा - एक सडा पारिजातकाचे झाड टाके आणि दुसरा सडा पाण्याचा तो आम्ही टाकत असू, शेजारच्या पोपटाचा सकाळपासून चालणारा किलकिलाट, आपण कुंडीत पेरलेल्या गाजराला तुरा फुटला की नाही हे बघण्यासाठी रोज सकाळी अंथरुणातून उठवणारी उत्सुकता, संध्याकाळी रसवंतीवर रस प्यायला किती वाजता जायचं हे मामा-दादाकडून कबूल करून घेताना होणारा जीवाचा आटापीटा, लहान आकाराचा आंबा मिळाला म्हणून येणारा क्षणिक रुसवा, आरशासमोर तासान तास नट्टा-फट्टा करते म्हणून मावशीला चिडवणं, उंबराखालच्या दत्त मंदिरात खडीसाखरेच्या प्रसादासाठी होणारी चढाओढ, दुपारची जेवणं झाली की मग लागणारे कुल्फीवाल्याच्या घंटीचे वेध, पुस्तकांशी एकरूप होऊन टारझन आणि सिंदबादबरोबर केलेल्या जंगलाच्या आणि समुद्राच्या असंख्य सफरी, लाडूचा आणि शेवांचा डब्बा कुठे ठेवलाय हे हेरण्यासाठी मामीची अधूनमधून करावी लागणारी खुशामत, रात्री बारापर्यंत चांदण्यांखाली आजोबा रागवेपर्यंत केलेल्या गप्पा, पॉटचे आईसक्रिम करताना उडालेली धान्दल, हातून एखादी चुकी झाली की रागावणाऱ्या आईविरुद्ध आपली बाजू घेणारे मामा-मावश्या-आजी-आजोबा, पूजेच्या वेळी आजोबांना मदत म्हणून स्वतःहून घेतलेलं चंदन उगाळून देण्याचं काम, भेटून जाणारे पाहुणे किती पैसे किंवा काय प्रेझेंट देतील ही दाबून टाकलेली उत्सुकता, आपल्या गावी परत गेल्यानंतर परीक्षेचा निकाल काय लागेल ह्या विचाराने अधुनमधून होणारी धाकधूक, उन्हाळ्याची सुटी संपायला आली की दाटून येणारी नकोशी विषण्णता ......
एखादी सुगंधी झुळूक कुठून कधी येईल हे सांगता येत नाही, तशा ह्या गोड आठवणीसुद्धा कुठलं निमित्त होऊन कशा जागृत होतील ह्याचा अंदाज बांधणं अवघड . एखादं जुनं गाणं कानावर पडल्यावर, एखादं जुनं बालभारतीचं पाठ्यपुस्तक नजरेला पडल्यावर, जुने फोटो बघताना किंवा आजकाल व्हाट्स अॅपवर अशा कविता वाचताना ह्या आठवणी जागृत होतात . त्या आठवणी आपण काढू जाता एवढ्या मनोरम्य वाटत नाहीत जेवढ्या त्या जेव्हा स्वतः आपणहून येतात तेव्हा वाटतात; त्यावेळचा त्यांचा साज, त्यांची साद आणि त्यांचा सांद्र स्पर्श मनाचं वय क्षणार्धात काही वर्ष कमी करून टाकतात . ते रम्य क्षण जागून मन पुन्हा वर्तमानात येतं, तेव्हा काहितरी चुकल्या चुकल्याची भावना सोबत घेऊनच . हे क्षण लुप्त होऊन कुठे जातात माहित नाही पण अंतःकरणाच्या कुठल्या तरी गुहेत ते कायम दडलेले असतात हे नक्की .
आजारपणात महागडी औषधे कुठून आणायची हे काळजी करायचं ते वय नव्हतं, आजारी पडल्यामुळे शाळेला सुट्टी मिळाली म्हणून आनंद साजरा करायचं ते वय होतं; कुटुंबासाठी काय त्याग करावा लागतो याची जाणीव असणारं ते वय नव्हतं, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आकांडतांडव करण्याची मुभा असलेलं ते वय होतं; देशाच्या रक्षणासाठी कुणी काय त्याग करीत आहे हा विचार करत बसण्याचं ते वय नव्हतं, आपले चोचले आणि लाड सर्वांकडून कसे पुरवून घ्यायचे ह्या काळजीचं ते वय होतं ! माणसाचं जीवन किती असुरक्षित असू शकतं हा विचार त्या वयात चुकूनही कधी तेव्हा मनाला शिवला नाही, मायेच्या पदाराखालचा निवारा त्या वयातल्या प्रत्येक समस्येवरचा रामबाण उपाय होता .
'तुला मोठेपणी कोण व्हायचंय' हा प्रश्न माझ्याप्रमाणे तुम्हा सर्वांना कुणी ना कुणी लहान असताना (म्हणजे तुम्ही लहान असताना) अनेकदा विचारला असेल (असला प्रश्न पाहुणेच जास्त विचारतात, फार उत्सुकता असते त्यांना). आत्ताचं वय त्या सर्वांचा राग येण्याचं आहे ! मोठं होऊन कोण बनायचं याचे सल्ले सर्वांनी दिले, पण 'लहानच राहा' असा सल्ला एकानीपण दिल्याचे आठवत नाही !
मामाचा गाव किंवा आजोळ म्हणजे मनाच्या संग्रहालयात हक्काने अढळपद प्राप्त करून घेतलेली वस्तू आहे . अल्झायमर्सचा आजार होतो तेव्हा माणूस नाव-गाव सर्व विसरतो, मामाचा गाव विसरत असेल की नाही शंकाच आहे . किंबहुना, हे विसरल्याशिवाय अल्झायमरचे निदानच होऊ नये असे मला वाटते ! एखाद्या साधू-संन्याशाला विचारा की तुमचं पूर्वाश्रमीचं नाव-गाव कोणतं ते सांगा . ते म्हणतील आम्ही सोडलंय सगळं . पण मामाच्या गावाने किती जणांना सोडलं असेल ही शंकाच वाटते !
अर्धा तीळ वाटून खाणारे प्रेमळ दुवे आता राहिलेत कुठे? बरणीतून खाली सांडलेल्या मोहोरीच्या दाण्यांप्रमाणे सगळेजण एकमेकांपासून विखुरलेत . तरीदेखील, हा आठवणींचा तीळ तुमच्याशी वाटून खाताना मला मात्र फार आनंद होत आहे ! सुटीतील गावाकडच्या क्षणांना miss करणारे तुम्हीदेखील माझ्यासारख्या नातू-भाच्या-पुतण्यासारखे कुणी एक असाल, तर ही कविता वाचा. जुना ग्रंथ चाळताना अचानक एखादे मोरपीस दृष्टीस पडावे, तशा या सप्तरंगी आठवणींच्या पंखांवर स्वार होऊन तुम्ही आपल्या आजोळची सहल नक्की करून याल .
"एप्रिल-मे चे दिवस, शाळेला सुट्टी
हातात नको पुस्तक-वही, हातात नको पट्टी
सुट्टीच्या पहिल्याच दिवशी धावत गावी जाणं
अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अलिबागलाच राहणं
पडवीवरती, ओसरी अंगणात पोरंच पोरं
कैऱ्या, आंबे, चिंचा आणि आंबटचिंबट बोरं
मुलींच्या भातुकल्या, सागरगोटे, बाहुल्यांची लग्न
मुलं मात्र दिवसभर उनाडक्यात मग्न
उन्हात उनाडणं, चतुर आणि फुलपाखरं पकडणं
शहाळी, ताडगोळे, जांभळं, करवंद खाणं
वाटेल तेंव्हा समुद्रावर धावणं
शंख-शिंपले गोळा करून वाळूचे किल्ले बांधणं
भेळ खाता खाता रोज सूर्यास्त बघणं
तो मासळीच्या वासाचा भन्नाट खारा वारा
वेळेचं नव्हतं भान मनाला नव्हता थारा
दिवेलागणीच्या आधी ते घराकडे पळणं
आणि हातपाय धुऊन पटापट जेवून घेणं
ती कातरवेळ त्या भुतांच्या गोष्टी
देवाला नमस्कार करून म्हटलेली शुभंकरोती
(आणि अचानक दाटून आलेली रिझल्टची भीती)
झोपाळ्यावर आजोबांचे श्लोक, आर्या,
परवचा, पाढे, (अरे बापरे, पावकी, निमकी, दिडकी)
मुलींचे उखाणे, कोडी, गाण्याच्या भेंडय़ा,
लपाछपी, चोर-शिपाई, डबा ऐसपस, खांब खांब खांबोल्या
व्यापार, सापशिडी, पत्त्यांचे डाव
भक्तिगीतं, भावगीतं, सिनेमाची गाणी
मामांच्या चेष्टा, मावश्यांची कौतुकं
आजोबांचा प्रेमळ दरारा, आजीचा प्रेमळ हात
नातवंडांना भारवलेला दहीदूध भात
अंगणातला प्राजक्त, परसातली बकुळी,
विहिरीजवळचा सोनचाफा आणि दरवळणारी रातराणी.
आणि ती चांदण्यात ऐकलेली आटपाट नगरची कहाणी
तीच एक होता राजा, एक होती राणी
काळोखाच्या गाण्याला आता रातकिडय़ांचा सूर,
हृदयात हळव्या आठवणी आणि मनातलं काहूर
कशाला झालो एवढं मोठं आणि कशाला आलो मुंबईला
गावापासून दूर!"
– सुभाष जोशी, ठाणे
0 comments:
Post a Comment
Hey! Don't spread CORONA but you can share and spread this article and make it viral ! 😊