Indigo children

   गेल्या तीन दशकात एका घडामोडीनं मानस शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलंय . स्वभावाने अती विचित्र-विक्षिप्त पण बुद्धीने विलक्षण तल्लख असा संयोग घेऊन जन्मणाऱ्या मुलांचं प्रमाण गेल्या तीन दशकात फार वाढलंय. एवढंच नाही, कुत्रा-मांजर-राजा-राणीच्या भावविश्वात रमणारं हे मूल मधेच एखादं वाक्य असं बोलून जातं की ऐकणाऱ्याने थक्क होऊन विचार करीत राहावं की परिपक्वतेतून उपजणारं हे ज्ञान एवढ्या बालवयात आलं कुठून ...? ह्यावर जगभरात खूप संशोधन झालंय, चाललंय आणि काही विलक्षण गोष्टी समोर आल्यात, त्याचा ह्या लेखात घेतलेला हा आढावा.

    ◾ हा Indigo Child नेमका काय प्रकार आहे?

   Indigo मुलांचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर असं करता येईल - Brain of a kid, vigor of youth, wisdom of aged and on a mission for humanity. ह्या मुलांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनुभवजन्य शहाणपणाच्या संकल्पनांना चांगलाच धक्का लावलाय. म्हणजे, शहाणपण अनुभवातून येतं की आणखी कुठल्या मार्गाने येतं ह्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी जुन्या पिढीला भाग पाडलंय. ह्या मुलांची विचार करण्याची दिशा आणि एखाद्या घडामोडीबद्दलची त्यांची प्रतिक्रिया सामान्य मुलांपेक्षा फार वेगळी असते. परंतु, त्यांनी जन्म घेतलेला असतो तो एका ठराविक, चाकोरीबद्ध विचारसरणीच्या समाजात, त्यात त्यांचा आणि समाजाचा तरी काय दोष! अशा समाजात वावरताना ही मुलं थोडी बावचळलेली असतात खरी, परंतु पालकांनो, जशी जशी ही मुलं मोठी होत आहेत आणि त्यांच्याबद्दलचे संशोधन प्रकाशात येत आहे, त्यावरून हे दिसत आहे की ही मुलं म्हणजे समाज, देश आणि जगाची एक अनमोल संपत्ती आहे. तुमच्या गतपुण्याईने फलित म्हणून असा एखादा धुळीने माखलेला सोन्याचा तुकडा तुमच्या कुटुंबात आला असेल तर तुमची जबाबदारी मोठी आहे! अशा मुलांशी वागावे कसे आणि त्यांचे संगोपन कसे करावे लागते हे सर्वात शेवटी पाहू.

    ◾ मानसशास्त्रज्ञांनी केलेला एक गमतीदार प्रयोग

   मानसशास्त्रज्ञांनी एक गमतीदार प्रयोग केला. त्यांनी ५-८ वयाची काही Indigo मुले-मुली गोळा केली आणि त्यांनी सर्वांपुढे एकाच प्रश्न ठेवला - प्रेम म्हणजे काय? त्यांना जी उत्तरे मिळाली ती ह्या चिमुरड्यांच्या विचारांची प्रगल्भता दर्शविणारी होती. आपण ह्या प्रश्नाचे काय उत्तर देऊ? थोडा विचार करा आणि आता ह्या मुलांची उत्तरे वाचा -


😀 "तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने तुमचे नाव घेताच तुमच्या हृदयात जे तरंग उठतात, त्याचे नाव प्रेम. तिच्या मुखात तुमचे नाव सुरक्षित आहे हे बघून तुम्हाला जे वाटते, त्याचे नाव प्रेम!"
😁 "प्रेम म्हणजे तुम्ही रेस्टाॅरंटमध्ये खायला जाता आणि समोर बसलेल्या व्यक्तीकडून कसलीही अपेक्षा ना करता तुमचे फ्रेंच फ्राइज त्याला देऊन टाकता, त्याचे नाव प्रेम."
😂 "प्रेम म्हणजे तुम्हाला दुखावणाऱ्या व्यक्तीचा आलेला राग गिळून तो दुखावू नये म्हणून आपण शांत राहणं."
😃 "अथक परिश्रम करून थकल्यानंतरही जे तुमच्या चेहेऱ्यावर हसू फुलवतं, त्याचं नाव प्रेम."
😅 "प्रेम म्हणजे आई जेव्हा बाबांसाठी कॉफी बनवते आणि ती कशी झाली आहे हे बघण्यासाठी थोडी चाखून पाहते, ह्याचं नाव प्रेम."
😆 "अधीर होऊन ख्रिसमसचे प्रेझेट्स सोडून बघताना आई-बाबांनी मधेच थांबवल्यावर तुम्ही शांतपणे त्यांचे शब्द ऐकून घेता, त्याचं नाव प्रेम."
😉 "तुमचा द्वेष कारण्याऱ्यावर जर तुम्ही माया करू शकलात, तर ते खरं प्रेम."
😏 "तुम्ही तुमचे अवगुण कोणालातरी सांगता आणि आता तो तुमच्यावर प्रेम करणार नाही असा विचार करून हिरमुसले होता.... पण तुमच्या जेव्हा लक्षात येते की तुमच्याबद्दलची त्याची आपुलकी मुळीच कमी झालेली नाही, ह्याचं नाव प्रेम."
😴 "प्रेम हे दोन प्रकारे व्यक्त होतं - एखाद्या व्यक्तीवर केलं जाणारं प्रेम आणि भगवंतावर केलं जाणारं प्रेम."
😭 "झोपताना आईने तुमचा मुका घेणं म्हणजे प्रेम."
😙 "संपूर्ण दिवस एकटा राहूनही जेव्हा तुमचा कुत्रा तुम्ही घरी आल्यावर तुमचे गाल चाटतो, ह्याचे नाव प्रेम."
😟 "तुम्ही एखाद्याला तुमचे दोष सांगू देता आणि त्याने ते सांगितल्यावर स्वीकारतादेखील, ह्याचं नाव  प्रेम."
😲 "एखादी प्रिय व्यक्ती बघितल्यावर होणारी तुमच्या पापण्यांची हालचाल आणि तुमच्या डोळ्यात उतरणारी चमक, म्हणजे प्रेम."
😢 "आपल्याला क्रुसावर चढवल्यानंतरही ईश्वर (ख्रिस्त) आपल्या शरीरातील खिळे आपल्या सामर्थ्याने काढू शकला असता; पण त्याने तसे केले नाही, ह्याचे नाव प्रेम."

   एक गंमत म्हणून तुमच्या आसपासच्या मुलांना हा प्रश्न तुम्ही विचारून पाहू शकता!

   Indigo बालकांची स्वभाववैशिष्ट्ये

⮚ ही मुले अतिशय संवेदनाक्षम असतात. सभोवताली घडणाऱ्या घटनांचा, होणाऱ्या आघातांचा

   त्यांच्या मनावर लवकर परिणाम होतो. 
⮚ Indigo मूल म्हणजे उत्साहानं आणि ऊर्जेनं भरलेलं थुई थुई नाचणारं करंज. ह्यांची बॅटरी कधी
   डिसचार्ज होतच नाही.
⮚ त्यांच्या आवडीचे आलंबन नसल्यास ही मुले पटकन् कंटाळतात. पण आवडीचा विषय मिळाला

   तर तासन् तास त्यात रंगून जातात. कुठल्यातरी एका गुणाचा त्यांच्यात अतिरेक झालेला आढळून
   येईल.
⮚ Kirlian photography द्वारे त्यांच्याभोवतीचे वलय (aura ) बघितल्यास ते निळ्या-जांभळ्या रंगाचे

   दिसते. (म्हणून Indigo हे नाव). सर्वप्रथम ही गोष्ट Dr. Nancy Ann Tappe हिच्या लक्षात
   आली.सामान्य माणसाचे वलय लाल-पिवळ्या-हिरव्या रंगाचे असते.
⮚ ते कधी कुणावरही जबरदस्ती करणार नाहीत आणि त्यांच्यावर केलेली जबरदस्ती तर मुळीच

   खपवून घेणार नाहीत. वरिष्ठ-कनिष्ठ ह्या प्रकारची वर्गवारी त्यांना मुळीच पसंत नसते. सर्वजण
   सामान दर्जाचे असतात ही भावना उपजतच त्यांच्याठायी असते. अप्रामाणिकपणा, अन्याय,
   खोटेपणा ह्यांच्याविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय ते राहणार नाहीत.
⮚ ह्यांच्याठायी प्रचंड आत्मसन्मान असतो. तो दुखावणाऱ्या लोकांवरचा त्यांचा विश्वास उडतो आणि ते

   दुःखी आणि अंतर्मुख होतात. ते मैत्री करतील तर अगदी मोजक्या लोकांशीच, ती पण चांगली
   पारखून आणि निवडूनच.
⮚ प्रचलित शालेय शिक्षणपद्धतीत त्यांना मुळीच रस नसतो. संपत्ती मिळवण्यासाठी शिक्षण घेणे

   म्हणजे आयुष्यातला वेळ वाया घालवणे अशी त्यांची धारणा असते.
⮚ शालेय विषयांमध्ये त्यांना नेहेमी कमीच मार्क असतात; तथापि IQ Test मध्ये ते जबरदस्त बाजी

   मारतात. सामान्यतः, ह्यांचा IQ १२५ च्या वरच निघतो. ह्यांच्यापैकी काही मुलांचा IQ तर १
   पर्यंत पण जातो.
⮚ आत्म्याशी सुसंवाद साधणाऱ्या किंवा नवनिर्मितीला वाव असणाऱ्या विषयांमध्ये - साहित्य, संगीत,

   चित्रकला, बागकाम, गणित, computer इ. - यांना फार रस असतो. निसर्गाचा सहवास त्यांना
   अत्यंत प्रिय असतो. आपल्या आवडीचे विषय न सापडल्यास ते पटकन अस्वस्थ होतात. त्यांना
   गर्दी आवडत नाही.
⮚ आश्चर्य वाटेल पण त्यांना राग फार पटकन् येतो! परंतु, बदल घ्यायचा म्हणून एखाद्याबद्दल मनात

   डूख धरून राहणे, ही गोष्ट त्यांच्याकडून कधीही होत नाही. त्यांचा स्वभाव मुळात फार प्रेमळ
   असतो पण प्रतिकूल लोकांच्या सहवासात तो दडपलेलाच राहतो.
⮚ त्यांचे पशु-पक्ष्यांवर फार लवकर प्रेम जडते, ही काही विशेष आश्चर्याची गोष्ट नाही. विशेष

   आश्चर्याची गोष्ट म्हणजे पशु-पक्ष्यांचंदेखील त्यांच्यावर फार पटकन् प्रेम जडते.
⮚ त्यांचे डोळे फार बोलके असतात. आणि ते जेव्हा बोलतात ते पण समोरच्याच्या डोळ्यात डोळे

   टाकून आणि अतिशय आत्मविश्वासाने. त्यांनी त्यांच्याशी बोलणाऱ्याचे मन जिंकले नाही असे 
   क्वचितच होते. 'आपण फार मोठी कामगिरी पार पडण्यास येथे आलेलो आहोत' असा त्यांचा
   आवेश असतो आणि समोरच्याने हे समजून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. एखाद्या गोष्टीबद्दल
   प्रतिक्रिया देताना त्यांना फार विचार करत बसावा लागत नाही, त्यांचे उत्तर आणि प्रतिक्रिया ह्या
   उत्स्फूर्त असतात.
⮚ बऱ्याचदा ही मुलं झोपेत अस्वस्थ असतात . त्यांचं झोपेतलं विश्व हे मानसशास्त्रज्ञांना न उलगडलेलं

   कोडं आहे.
⮚ दुसऱ्या Indigo व्यक्तींच्या सहवासात त्यांची वागणूक विनासायास खुलते, हे विशेष!
⮚ ही मुले बऱ्याचदा समोरच्याच्या मनात चाललेल्या गोष्टी ओळखू शकतात आणि तसे ते बोलून पण

   दाखवतात. काही मुलांना अचानक विशिष्ट स्थानी जाण्याची अथवा विशिष्ट व्यक्तीकडे जाऊन
   तिच्याशी बोलण्याची प्रेरणा होते. ते तसे का करतात ह्याचे कारण त्यांना सांगता येईलच, असे
   नसते.
⮚ ह्या मुलांचा उत्साह, त्यांच्या आकांक्षा जशा पराकोटीच्या असतात, तशीच ही आकांक्षापुर्ती न 

   झाल्याने त्यांना आलेली निराशादेखील गडद असते. पालकांनी वा शिक्षकांनी दिलेल्या प्रतिकूल
   प्रतिसादांमुळे अथवा आपल्या महत्त्वाकांक्षेला अनुरूप दिशा न मिळाल्याने तरुणपणी बरीच
   Indigo मुले अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची उदाहरणे आहेत. सुखवस्तू समाजात राहूनदेखील
   पिंजतल्या पोपटाचं आयुष्य जगणं त्यांना रुचत नाही.

    ◾ Indigo मुलांचे काही मनोरंजक किस्से:

✶ टॉड हा तीन किंवा चार वर्षांचा मुलगा आपल्या आजीच्या घरी खेळायला गेला. आजीच्या बेडवर ठेवलेला चायनिज चेहेऱ्याचा एक जोकर त्याला आवडला नाही म्हणून त्याने आपटून आपटून त्याचे तोंड विद्रुप करून टाकले. आजीने त्याला बोलावले आणि शांतपणे त्याला विचारले,"टॉड, तुझं सर्वात आवडतं खेळणं कोणतं?" टॉड म्हणाला,"पोलीस ट्रक."आजी म्हणाली,"तुझ्या घरी येऊन मी तुझा तो ट्रक मोडून टाकलेला तुला आवडेल?" टॉड म्हणाला,"मुळीच नाही." आजी म्हणाली,"आता तू जर आजीच्या जागी असतास तर तुझं खेळणं मोडणाऱ्याला तू काय केलं असतं?" टॉड विचारात पडला आणि म्हणाला,"ह्यावर विचार करायला मला थोडा अवधी दे." असे म्हणून तो एका खोलीत जाऊन दार बंद करून बसला. ह्यानंतर आजीने त्याच्याशी क्रोध, मोह, भीती इ. विषयांवर काही तात्विक चर्चा केली आणि त्याच्या मनातला गुंता दूर झाला.

✶ आठ वर्षाचा ओली सारखा म्हणायला लागला,"मला आता मरायचंय, जगण्यात काही अर्थ उरलेला नाही!" त्याची आई त्याला समुपदेशिकेकडे घेऊन गेली. तिने खोदून विचारल्यावर तिच्या डोळ्याला डोळा भिडवत ओलीने मनातील व्यथेला वाट करून दिली,"तुम्हाला आई असूनही तुमच्यावर प्रेम करायला तिला वेळ नसेल तर अशा प्रकारचे जीवन जगण्यात काय अर्थ आहे? यासाठी मला तुमची मदत घ्यायची वेळ येते, ही किती खेदाची गोष्ट आहे..." वस्तुस्थिती अशी होती की ह्या मुलाचे वडील सारखे तुरुंगाच्या वाऱ्या करीत असत आणि संसाराचा गाडा रेटण्यासाठी आई कामानिमित्त सारखी बाहेर असे. शाळेत शिकवण्याकडे ह्याचे लक्ष कधीच नव्हते पण ह्याची IQ टेस्ट केली गेली तेव्हा त्याचा नंबर सर्वोच्च श्रेणीमध्ये (१३० च्या पुढे) येत असल्याचे दिसले!

✶ एका १४ वर्षाच्या मुलीला अभ्यासातील खराब कामगिरीमुळे शाळेतील एक वर्ष पुन्हा त्याच वर्गात बसवले गेले. वाद घालायची तिला आवड होती आणि युक्तिवादामध्ये ती तिच्या आई-वडिलांना कधीही जिंकू देत नसे. त्यांच्या परवानगीशिवाय ती त्यांची कार बाहेर फिरवण्यास नेत असे. ह्या गोष्टीचे कारण समजले नाही पण तिचा IQ मोजला गेला तेव्हा १२९ भरला!

✶ सहा वर्षाचा झाचरी खोलीभर खेळण्याचा पसारा मांडून बसला होता. त्याच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर स्वारी खेळण्यांच्या गराड्यात डोळे बंद करून शांतपणे बसली होती. 'हा काय वेडेपणा' असे वाटून त्याचे वडील जरा ओरडलेच,"झाचरी, तुझी खेळणी आवर चल." हा शांतच. वडील पुन्हा ओरडले. झाचरीने डोळे उघडले आणि तो शांतपणे म्हणाला,"थोडं थांबा, माझा माझ्या अंतरात्म्याशी संवाद चालू आहे. तो संपल्यावर आवरीनच!"

✶ शशी तीन वर्षाचा असतानाची गोष्ट. सगळे नातेवाईक एकत्र जमले होते आणि शशीवर कोण कोण प्रेम करतं ह्याची यादी बनवणं चालू होतं. यादी पूर्ण झाल्यावर शशी म्हणाला,"सर्वात जास्त प्रेम माझ्यावर मीच करतो कारण त्यामुळे मला ऊर्जा मिळते!"

✶ तीन वर्षाचा जस्टिन एकदा त्याच्या आईला म्हणाल,"आई, तू पत्र आहेस आणि मी पाकीट!" (लिफाफा). त्याची आई तर हे ऐकून पार बुचकळ्यात पडली. तिने विचारले,"नक्की म्हणायचंय काय तुला?" जस्टीन म्हणाला,"बघतेस ना, तुझी खुशामत करणारे लोक माझे किती लाड करतात ते. खरं म्हणजे माझ्यावर प्रेमाचा देखावा करून त्यांना तुलाच खुश करायचं असतं! आपण पत्र तेवढं घेतो आणि पाकीट मात्र फेकून देतो तशातलाच हा प्रकार नाही का?" ह्या चिमुरड्याच्या डोक्यात ही कल्पना आली कुठून ह्या विचाराने त्याच्या आईच्या डोळ्यांत पाणी तरळले.

✶ १४ महिन्यांचा अली स्वयंपाकघरात गेला आणि किचन ट्रॉलीचे दार उघडून आतल्या सर्व भांड्यांचा खोलीभर पसारा करून ठेवला. त्यात वेगवेगळ्या आकाराचे तवे, भांडी, थाळ्या इ. सर्व होतं. त्याच्या आईने हे बघून कपाळावर हात मारून घेतला आणि काहीतरी काम निघाले म्हणून ती दुसरीकडे निघून गेली. साधारण वीस मिनिटांनी ती परत अली तेव्हा तिने पहिले की अलीने ती सर्व भांडी जागच्या जागी पद्धतशीरपणे पुन्हा लावून टाकली होती!

✶ सहा वर्षाच्या रॉबिनला त्याची मैत्रीण म्हणाली,"माझे डॅडी इतके ताकतवान आहेत की ते तुझ्या डॅडींना एका ठोशातच लोळवतील!" रॉबिन म्हणाला,"आंतरिक ताकत हीच माणसाची खरी ताकत असते!"

✶ चार वर्षीय किमने तिच्या आईला लहानपणीच सांगून टाकलं,"मला शाळेत घालू नकोस. मोठं होऊन मला एक उत्तम गृहिणी बनायचंय आणि घर चालवायचं. त्यासाठी शाळा कशाला?"

ह्या मुलांच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना किती सुस्पष्ट आणि उच्च जीवनमूल्यांशी निगडित आहेत हे बघून आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही!

  भाग दोन मध्ये आपण बघूया:

- गतजन्मातील स्मृती घेऊन जन्मलेल्या रशियातील बोरिस्का या Indigo मुलाची भन्नाट कथा

- Indigo मुलांचे संगोपन कसे करावे लागते?

- एक Indigo video

वाचा : तुमच्या घरात जन्मलेलं मूल Indigo Child असू शकतं ...! (भाग - २)