संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथादी संतांची त्यांच्या काळी असलेल्या मुमुक्षूंसोबत अनेक आध्यात्मिक संभाषणे झाली असणार, पण दुर्दैवाने ती आपल्याला उपलब्ध नाहीत! विज्ञानाची जशी जशी प्रगती होत गेली तसा तसा हा जीवन्मुक्तीची दिशा दाखवणारा दिव्य ज्ञानाचा ठेवा विविध माध्यमांतून शब्दबद्ध होऊन जपला जाऊ लागला हे आपले सौभाग्यच. भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितलेले विविध उपदेश मास्टर महाशयांनी लिहून ठेवले व ते ज्या पुस्तक रूपाने आकारास आले ते 'श्रीरामकृष्णवचनामृत' त्याचे उत्तम उदाहरण. सकळ जीवांना मुक्तपणे लुटण्यासाठी उघडा करून ठेवलेला शब्दब्रह्माचा खजिनाच तो. श्री गोंदवलेकर महाराज हे बेलसरे बाबांचे आध्यात्मिक गुरु. आपल्या गुरूंशी त्यांचे संभाषण एका माध्यमाच्या माध्यमातून होत असे! तत्त्वज्ञानाचा सखोल व्यासंग आणि विविध ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांचा लाभलेला दीर्घकालीन सत्संग, ह्यामुळे प. पू. के. वि. बेलसरे ह्यांची प्रवचने वा संभाषणे परमार्थपिपासू साधकांसाठी एक पर्वणीच असायची. आपल्या निवेदनाच्या ओघामध्ये पारमार्थिक जीवनातील काही शाश्वत सत्ये आणि श्री गोंदवलेकर महाराजांनी त्यांना सांगितलेले अनमोल विचार त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत. अशाच काही विचार मौक्तिकांचे केलेले हे संकलन.

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य के. वि. बेलसरे  K. V. Belsare

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचने व विचार

- "देह ठेवल्यानंतर बारा वर्षांनी श्रीमहाराज पुन्हा वाणीरुपानी आले आणि पू. तात्यासाहेबांच्या मुखाने बोलू लागले. माझी व श्रीमहाराजांची भेट ह्या माध्यमातूनच होत असे."

- "विद्या शिकण्यासाठी शाळा आहे तसं परमार्थ शिकण्यासाठी प्रपंच आहे."

- "संतांच्या अंतःकरणाची तुम्हाला कल्पनाच येणार नाही."

- "सद्गुरू शिष्याला नामाचे प्रेम लागावे म्हणून आपल्यापासून दूर ठेवतात, अन्यथा नुसते देहाचेच प्रेम लागते."

- "निर्गुणाच्या कितीही गप्पा मारा, सगुणाचं प्रेम काही वेगळंच असतं."

- "एक मुख्य धंदा असतो, एक जोडधंदा असतो. नाम घेणे हा मुख्य धंदा आणि प्रपंच हा जोडधंदा."

- "भांडण असं करता आलं पाहिजे कि एकदा वापरलेली शिवी ही पुन्हा देता काम नये!"

- महाराज म्हणत,"तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे ह्यापलीकडे सत्य सांगतो, मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही." आणि आपण त्यांना देणार तरी काय?

- श्री महाराज आपल्या आईबद्दल - "आंबा लागलाय म्हणजे आंब्याचं झाड असलं पाहिजे!"

- "पण महाराज, तुम्हाला हे सुचतं तरी कसं ?"
   महाराज - "माझ्या गुरूंनी मला नाम दिले आणि ही ज्ञानाची पेटी उघडली."

- "तुमचे देहावर जेवढे प्रेम आहे तेवढे त्यांचे नामावर होते."


- "श्रीमहाराज म्हणत, जगात चार प्रकारची माणसे असतात. १. आत झोपलेले आणि बाहेरही झोपलेले - मूढ  २. आत झोपलेले आणि बाहेर जागे - प्रापंचिक  ३. आत जागे आणि बाहेर झोपलेले - तुकाराम महाराजांसारखे  ४. आत जागे आणि बाहेरही जागे - एकनाथ महाराजांसारखे"

- "अवधान दोन प्रकारचे असते - १. एकाग्र - हे योगाने साधते  २. समग्र - हे भक्तीने साधते."   

- "श्रीमहाराज म्हणत, पैसे नसला तर अडते आणि असला तर नडते म्हणून पैशाची विवंचना बाजूला ठेऊन नाम घेतले पाहिजे."

- "आपण नसताना कोणाला विचारायचे असे एका भक्तांनी श्रीमहाराजांना विचारले. श्रीमहाराज म्हणाले, दोन प्रकारे - रात्री झोपताना सांगावे व सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा जे मनात येईल तसे वागावे किंवा सर्व घटनेतील 'मी' काढून टाकून कानावर घालावे आणि मग आतून प्रेरणा येईल त्याप्रमाणे वागावे." 

- "श्रीमहाराज म्हणत अहंकार वाईट का, तर तो माणसाला संकुचित करतो आणि परमात्मा तर व्यापक आहे. संकुचित राहून व्यापकाचे ज्ञान होणार नाही."

- "आपल्या गुरूंना तीन गोष्टी आवडतात : १. अखंड नामस्मरण  २. अन्नदान आणि  ३. सगुणाचे प्रेम 

- "श्रीमहाराज म्हणत की ज्ञानमार्ग हा संन्याशाच्या डोक्यासारखा खरखरीत (रुक्ष) आहे तर भक्तिमार्ग लहान मुलाच्या जावळासारखा मऊ (कोमल) आहे."

- "श्रीमहाराज म्हणत की जो फोटो पाहून नाम घ्यावेसे वाटेल तो फोटो माझा." 

- "विस्मरण ही वृत्ती आहे, कारण ते अज्ञानाचं लक्षण आहे. स्मरण ही कृती आहे, ते ज्ञानाचं लक्षण आहे. त्यामुळे नामाला बसल्यावर तुम्ही शक्ती दिली तरच ते होईल असा भाव ठेवावा, नाहीतर कर्तेपणाचा लटकेपणा उत्पन्न होईल."

- "कुठेही इकडेतिकडे जाऊन काम होणार नाही, सगळं आपल्याजवळच आहे."

- "सारखं 'तू आहेस', 'तू आहेस' असं वाटलं पाहिजे. नामातील सूक्ष्मता म्हणजे त्याच्या अस्तित्त्वाची जाणीव."

- "कुठलाही आघात उत्पन्न न करता जो नाद निर्माण झाला, त्याचं नाव अनाहत नाद. हा नाद ज्याच्या अंतःकरणात कायम स्थिरावला तो सत्पुरुष."

- "जो नामात आहे त्याला सत्पुरुषाचे पुस्तक न वाचताच कळेल."

- गुरुदेव रानडे मला महणाले,"नामात योगाचे सर्व अनुभव येतात."

- महाराज - "मी रामाचा उपासक खरा पण मला कृष्णासारखं वागणं आवडतं."

- "समजा एखाद्या माणसात दोष आहे आणि तुम्हाला तो दोष काही आवडत नाही. तो ज्या परिस्थितीत वाढला, त्या परिस्थितीत तुम्हाला ठेवलं असतं, तर तुम्हाला तो दोष लागला नसता हे तुम्ही खात्रीने सांगू शकता काय? मग त्याला का बरं नावं ठेवता? म्हणून नेहेमी निर्दोष विचार करावा व कशातही गुंतू नये."

- ८-१० वर्षांची ती मुलगी महाराजांच्या दर्शनाला गेली. महाराज निजले होते. पांघरूण होतं पायावर. ती गेली अन् पांघरूण काढलं. काढलं तर पाहते गुलाबाची फुलं पायांवर होती! तेव्हा महाराज म्हणाले,"ब्रह्मानंदांनी किंवा आनंदसागरांनी मानसपूजा केली असेल....!"

- "प्रत्येकाला असं वाटे महाराजांचं प्रेम माझ्यावरतीच आहे. काय खुबी असेल ही? ऐकलंय ना तुम्ही, ३-४ महिने बाळंतीण होऊन मुलगी अली तेव्हा तिचं ते पोर महारांकडून तिच्याकडे परत जायचंच नाही! हे आकर्षण आत्म्याचं आकर्षण आहे."

- "महाराजांशी संबंध येऊन त्यांनी मला 'आपला' म्हटले, यापरते आणखी भाग्य काय आहे जगामध्ये?"

- "परमार्थात अनुभव पाहिजे, तो लगेच कसा मिळेल? आपल्याला पचेल, झेपेल एवढेच ते देणार."

- "गुरूला जिवंत करणे हे शिष्याच्या हातात आहे."

  रात्री शवासनात नाम घेत होतो. एकाएकी दृष्टीसमोर श्रीमहाराजांचे निष्ठावान भक्त कै. डॉ. पाथरकर आले. त्यांनी नेहेमीप्रमाणे 'काय गुरु! काय चाललंय ?' म्हणून विचारले. 'नाम ठीक चालू आहे, असंच चालू ठेवा' म्हणाले. देह सोडल्यानंतर इतक्या वर्षांनी आपण कसे काय आलात म्हणून मी विचारल्यावर ते म्हणाले की तुमच्या जगातील काळ आणि ह्या जगातील काळ वेगळे आहेत. तुमची ८-१० वर्षे येथे एखाद्या दिवसासारखी आहेत. येथेही नाम चालू आहे; पण ते शब्दरूप नाही तर भावरूप किंवा जाणीवरूप आहे. ह्या जगात वासनांचा विक्षेप नाही, येथे नामाचे स्वरूपच वेगळे आहे. मी त्यांना योगी अरविंद वगैरे भेटतात का म्हणून विचारले तेव्हा ते म्हणाले की योगी अरविंद, रमण महर्षी, श्रीमहाराज येथून खूप दूर आहेत.


- "दारेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा - ह्या तिन्हींचा संगम म्हणजे अहंकार. हा अहंकार मन, बुद्धी आणि कल्पना ह्यांतून व्यक्त होतो."

- " नवरा आणि बायकोच्या भांडणाचे वेदमंत्र ठरलेले असतात आणि ते वर्षानुवर्षे चालतात! 'लग्नामध्ये तुझा मामा मला असे असे बोलला' हे ४० वर्षे स्मरणात राहते, भगवंताचे स्मरण मात्र राहत नाही!"

- "अर्जुन रथात बसलेला आहे, भगवान रथाचे सारथ्य करीत आहेत. घोड्यांचा लगाम भगवंताच्या हातात आहे. तसे आपल्या प्रपंचाच्या दोऱ्या द्या त्यांच्या हातात. आली गीता मग!."

- "व्यापारी लोकांना एखाद्या दिवशी विक्री झाली नाही की दिवस फुकट गेल्यासारखा वाटतो, तास माझा दिवस भगवंताच्या स्मरणाशिवाय गेला तर तो फुकट गेला असे वाटले पाहिजे."

- "सत्पुरुषाला तुम्ही बाहेरून काय ओळखणार? त्याला काय शिंगं फुटतात कि काय होतं? माणसासारखाच तो माणूस असतो; खाणं-पिणं-उठणं -बसणं सगळं आपल्यासारखं असतं, पण आतली अवस्था काय असते! भगवंताचे नाम तो क्षणभरसुद्धा विसरत नाही."

- महाराजांना एका माणसाने विचारले की "महाराज, जप करताना आसन कोणते पाहिजे?" महाराजांचे उत्तरसुद्धा कमालीचेच! म्हणाले,"तुम्ही श्वास घेताना कोणते आसन घालता?" काय उत्तर आहे!

- "नामामध्ये quality पाहिजे. पण ती पुष्कळ quantity केल्याशिवाय येत नाही!"

- "सत्पुरुषांजवळ आल्यानंतर त्याच्या ज्या ज्ञानाच्या लहरी असतात, त्या ग्रहण करायला ३ दिवस लागतात."

- "प्रपंचाची काळजी हळुहळू कमी होत गेली, तर नाम बरोबर चाललंय असे समजावे."

- "वैराग्य हे निष्ठूर असते."

- "निर्भय म्हणजे ज्याचे भय नाहीसे झाले तो आणि अभय म्हणजे ज्याला भयाचा स्पर्शदेखील झाला नाही तो."

- "महाराजांची प्रवचने आहेत ना, त्यात 'अखंड' हा शब्द २००-३०० वेळा आला आहे."

- "संतच एक जिवंत आहेत जगामध्ये. बाकीचे सगळे जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. आणि आपल्याला जिवंत व्हायचे आहे खऱ्या अर्थाने. ह्याचा अर्थ, माझे खरे रूप जे आहे, ते मला ओळखायचे आहे."

- "लोक नमस्कार करतात त्याच्या आधीच मी त्यांना मनाने नमस्कार करतो."

- "गुरुचे आज्ञापालन हे फार कठीण पण फार हुकुमी साधन आहे."

- "आपण ग्रंथ वाचतो तेव्हा तो कळणे कित्येकदा आपल्या त्यावेळच्या मनःस्थितीवर अवलंबून असते. पण सत्पुरुषाने सांगितलेले त्याच्या तोंडून श्रवण करायला मिळाले तर ते जास्त परिणाम करते, कारण ते आतपर्यंत जाते."

- "अध्यात्मात पूर्णत्वाला पोचण्याच्या पायऱ्या: १. संतसंग व संतमुखाद्वारे अध्यात्मविषय श्रवण २. ध्येयप्राप्तीची इच्छा ३. भगवंतासाठी कर्मे करणे ४. खऱ्या वैराग्याचा उदय ५. सद्गुरूची भेट व अनुसंधानाचा आरंभ ६. साधनात (नामात) स्थिर होणे ७. भगवंताचे दर्शन

- "जप कमी होऊ लागला की आतून सांगितले जाते की अरे, जप कर, जप कमी होतोय, जप कर. हे गुरूंचे अंतर्यामीत्व. जप कर अशी तेच आतून सूचना करतात. कारण जप कमी झाला तर त्यांना आत राहावयास कष्ट होतात. नाम हाच त्यांचा प्राण आहे."

- "एक वर्षभर शक्य तितके नामस्मरण करीत राहायचे आणि खोटे बोलायचे नाही. हे जमले तर वाचासिद्धी प्राप्त होईल."

- "भगवंताच्या अस्तित्वाचा थोडा जरी अनुभव आला तरी नामाची चटक लागेल."

- "जो परमार्थ प्रपंचात आणता येत नाही तो परमार्थ नव्हेच. प्रपंचही भगवंतानेच दिलेला आहे ना?"

- "'काय' म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते 'कोण' म्हणायला सांगतो, यात त्याचे महत्त्व आहे. जो म्हणावयास सांगतो त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते."

- "मरणाचे स्मरण राहिले म्हणजे पापाचरण आपोआपच कमी होईल, ते कमी झाले की सद्वासना येऊ लागतील व लक्ष थोडे परमार्थाकडे लागेल; ते लागले म्हणजे नाम घेण्याची बुद्धी होईल. नाम घेतले की भगवंताचे प्रेम आपोआप येईल. ते आले म्हणजे अनुसंधान राहील. अनुसंधानाने चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धीने एकाग्रता साधेल. ते झाले की आपले काम होऊन जाईल."

- "ज्या संताकडे आपले खाते असते त्याची भेट होईपर्यंत असेच हिंडावे लागते."

- "गुरुआज्ञेप्रमाणे वागले तर भोग टळला नाही तरी सुसह्य खास होईल."

- "एकंदर चौऱ्यांशी लक्ष योनी आहेत. मनुष्यजन्म सोडून इतर साऱ्या योनींमध्ये वाणीची देणगी नसते. ती फक्त मनुष्यजन्मातच आहे. तेव्हा भगवंताने आपल्याला वाणी दिलेली आहे याची सतत जाणीव ठेवावी. ती वाणी भगवंताला वाहायची म्हणजे त्याचे सतत नामस्मरण करणे हेच होय."

- "माणसामध्ये जेवढी सहजलीनता आलेली असते तेवढे भगवंताचे प्रेम आतमध्ये त्यास लागलेले असते असे निर्विवाद समजावे."

- "नामस्मरणात उठणारे विचारांचे काहूर म्हणजे षड्रिपूंना 'नोटीस' पोहोचल्याचे चिन्हच."

- "अन्नदानाने हात, तीर्थयात्रेने पाय, नामस्मरणाने मुख आणि शरणागतीने चित्त पवित्र होतात. मग रामाला कृपा केल्यावाचून राहवत नाही. "

- "भगवंत आहे या श्रद्धेने उपासना सुरु करावी, प्रचीति नंतर आपोआपच येईल."

   माळिये जेउते नेले । तेउते निवांतचि गेले । तया पाणिया ऐसे केले । होआवे गा ॥ १२०:१२ ॥
   ही ओवी मला अतिशय आवडते. तिच्यामध्ये मला माझ्या जीवनाचे साधनध्येय सापडले. 

   मी नाम घेतो तेव्हा माझ्या मनात विचार येतात. पण श्री महाराजांचे सांगणे असे की जपाच्या वेळी येणारे विचार दाबू नयेत. त्यांना भगवंताकडे वळवावे. म्हणून जपाचे वेळी भगवंताविषयी किंवा श्रीसद्गुरूंविषयी किंवा नामाविषयीच विचार चालू ठेवण्याची सवय मनाला मी लावून घेतली आहे. त्याचा फायदा असा आहे की जपाच्या वेळी फार मनोहर विचार सुचतात. त्या दिवशी एकीकडे माझा जप शांतपणे चालू होता. त्याचबरोबर दुसरीकडे माळी शब्दाच्या अर्थसौंदर्याने मन मोहून गेले होते. एकाएकी विश्वाचे प्रचंड उद्यान सांभाळणारा माळी, जो भगवंत, त्याच्या दिव्या संकल्पनेने माझे अंतर्याम भरले. श्रीज्ञानराजांच्या मनात जो भाव होता तो माझ्या अंतरी प्रगटला. त्याबरोबर माझे मन नकळत एका अतींद्रिय अवकाशात गेले. तेथे मला जिकडेतिकडे जीवन म्हणजे जिवंतपण दिसू लागले. माझा देह जसा डोक्यापासून पायापर्यंत जीवनाने भरलेला आहे अगदी तसे संबंध विश्व जिवंतपणे भरलेले प्रत्यक्ष दिसू लागले. मी चांगला शुद्धीवर होतो. मी गोंदवल्यास आहे आणि मी नित्याचा जप करीत आहे याचे भान मला होते...

...असा एक दहा मिनिटे काळ गेला सेल आणि मी स्वतःला विसरलो. त्या अवस्थेत आपण गोंदवल्यात आहोत व आपला जप चालू आहे याचे भान मला उरले नाही. पण श्री राम जय राम जय जय राम हा मंत्र एकीकडे माझ्या आंत निनादात होता आणि त्याचबरोबर दुसरीकडे सर्व दिशांमधून तो स्पष्टपणे स्पंदन करीत होता. श्री सद्गुरुंकडून आलेल्या व मी अनेक वर्षे जोपासलेल्या नामाचे ते विशाल, दिव्या आणि अतींद्रिय स्वरूप माझ्या मनावर मोठा परिणाम करून गेले.


- "पैसा पुष्कळ असणे, प्रपंच मनासारखा असणे, प्रकृती बरी असणे, विद्या पुष्कळ असणे, मानमरातब असणे, ही काही भाग्याची खरी लक्षणे नव्हेत."

- "जो मुलगा आईवडिलांचे ऐकत नाही, तो माझे तरी काय ऐकणार! म्हणून काही दिवस आईवडिलांची सेवा करावी आणि नंतर माझ्याकडे अनुग्रह घेण्यास यावे."

- " जेव्हा भगवंत भेटावा ही उत्कट तळमळ लागेल तेव्हा सद्गुरू आपला शोध करीत आपल्या घरी येतील."

- "श्रीमहाराज म्हणतात की मी जितका खरा वाटतो, तितके नाम खरे वाटू लागले म्हणजे साधकाचे काम झाले."

- "प्रपंच करायला गेलेला कुणीही सुखी झाला नाही व परमार्थ करून कोणी आजवर दुःखी झाला नाही."

- "भगवंत स्वतः 'आठवा' होता. त्याने गीतेच्या 'आठव्या' अध्यायात 'आठव्या' श्लोकात त्याला कसे 'आठवावे' ते सांगितले आहे."

- "तुम्ही तत्त्वज्ञानाची शेवटची परीक्षा (पी.एच.डी.) दिलेली आहे, 'तुम्ही मॅट्रिकच्या वर्गात बसा' असे जर उद्या तुम्हाला कोणी म्हणाले तर तुम्हाला जे वाटेल, तेच सिद्ध पुरुषास 'तुम्ही चमत्कार करून दाखवा' असे आपण म्हटले तर वाटते."

- "ज्याच्या समाधीपाशी मन शांत होते आणि चटकन् अंतर्मुख होते ती पुण्यभूमी आहे असे नक्की समजावे."

- "स्तोत्र म्हणणे हे पत्राने भगवंताची भेट घेण्यासारखे आहे. नाम घेणे हे भगवंताला प्रत्यक्ष भेटण्यासारखे आहे, म्हणून नाम हवेच."

- "श्रद्धेने केलेले ते श्राद्ध."

- "जो आपल्याला हवे ते देत नाही, तरीही आपल्याला जो हवाहवासा वाटतो, तो संत असला पाहिजे. त्याच्या अंगी इतके समाधान असते की त्याच्या सहवासामध्ये आपले मन समाधान पावते. संतांच्या समागमामध्ये अकारण प्रसन्नता येते. जेथे सगुणाची अखंड उपासना चालते, आल्यागेल्याला प्रेमाने अन्न दिले जाते आणि मनापासून नामस्मरण केले जाते, तेथे संत जागृत आहे असे खास समजावे."

- "भगवंताची भेट सहजपणे होण्यासारखी असून मनन नसल्याने माणूस ती गमावतो."

- "प्रपंचातील माणूस निर्धास्त असतो, हे एक मोठे आश्चर्य आहे. तो ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. तो केव्हा भडकेल ह्याचा नेम नाही."

- "नामस्मरणात दोन तास मन गुंतवणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही."

- "शरीरामध्ये विनासायास रक्त सारखे फिरते ना, तसा अजपाजप चालतो."

- "जीवाचे विषयप्रेमाचे विष शोषून घेऊन त्याला भगवंताकडे वळविणे हे काम मृत देह उठविण्यापेक्षाही अवघड आहे."

- "जागेपणी तुम्ही अखंड नाम घ्या, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम चालू ठेवण्याची जवाबदारी माझी, असे श्रीमहाराजांनी म्हटले आहे."

- "एखाद्या माणसाला भाग्याने खूप संपत्ती मिळाली, पैसे मिळाला, तरी तो भोगण्याची संधी मिळेलच असे नाही."

- "ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. गोंदवल्याहून आपण एवढे जरी शिकून गेलात ना तरी महाराज म्हणतील धन्य झाला!"

- "वृत्ती आवरणे, वृत्तींवर स्वामीत्व मिळवणे आणि सरतेशेवटी वृत्ती नाहीशी करणे म्हणजे परमार्थ."

- "मनाच्या ३ पातळ्या: १. बाह्यमन २. अंतर्मन (चिंता, काळजीचे स्थान) ३. चित्त (जन्मजन्मांतरीच्या संस्कारांचे स्थान)"

- "जर साधनेला बरोबर सुरुवात झाली तर स्वप्नामधेपण सुधारणा होते."

- "नामाने विकार जिंकून आपण जर महाराजांच्या समोर आलो ना तर ते समाधीतून बाहेर येऊन तुम्हाला आलिंगन देतील!"

- "गोंदवले, सज्जनगड, पंढरपूर, आळंदी म्हणजे त्या त्या संतांच्या universities होत!"

- "मी करतो हे शब्द महाजांनी आयुष्यभर उच्चारले नाहीत."

- "नाद ऐकू येणे, प्रकाश दिसणे अशांसारख्या अनुभवांपेक्षा मनःशांती वाढणे हा नामाचा खरा अनुभव आहे."

- महाराज म्हणत,"व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकाच दोष आहे." "काय?" "मला दुसऱ्याचे दुःख पाहवत नाही." म्हणूनच ते महाराज हो!

- "ते कांगारू असते ना, पोटाला पिशवी असते व तिचे ते पिल्लू ती त्या पिशवीत ठेऊन सर्वत्र जाते. त्या पिल्लासारखे महाराजांच्या कुशीत शिरून नामस्मरण करावे."

- "ज्ञान आणि शहाणपण ह्यात फरक आहे. विद्वत्ता ही अहंकार निर्माण करते, त्यात माणसाची देहबुद्धी काम करते; शहाणपण लीनता निर्माण करते कारण त्यात माणसाची आत्मबुद्धी काम करते."

- "ज्यावेळेस नाम जमणार नाही त्यावेळी मोठ्याने नाम घ्यावे. पण मोठ्याने म्हणजे लोकांना ताप होईल एवढ्या मोठ्याने घेऊ नका हं!"

- "ब्रह्मानंद महाराज म्हणाले,"अरे पंढरपूरचा विठोबा हा दगड नाही आणि महाराज हे माणूस नाही."

- "अडचण त्यांच्या कानावर घातल्यानंतर माझे मन शांत झाले पाहिजे ही खरी खूण आहे त्यांच्या अस्तित्वाची."

- "नामस्मरण जेव्हा चांगले होते तेव्हा हे मी केले नाही हे लक्षात येते, पण नेहेमीच असे हे घडते असेही नाही."

  एकदा माझ्या पोटाच्या डाव्या बाजूस गळू झाले होते. श्रीमहाराजांनी डॉ. पाथरकरांना सांगून इंजेकशन देववून ते बरे करवीले आणि म्हणाले की सध्या हे बरे झाले आहे पण चार-सहा महिन्यांनी पुन्हा येईल. आणि तसेच झाले! पुन्हा गळू झाले तेव्हा कॉलेजला सुट्टी होती. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले की आता औषध नको, भोगून संपवा!
**** ***** ***** ***** ***** ***** ***** ****
  दांडेकर आडनावाच्या एक बाई होत्या, त्यांनी आपले पूर्ण जीवन नामाला वाहून घेतले होते. एकदा ब्रह्मानंद महाराज त्यांच्या घरी विश्रांती घेत असताना त्यांना ह्या बाईंच्या कण्हण्याचा आवाज आला. त्यांनी पहिले तर बाईंच्या अंगात खूप ताप होता. आता ताप सहन होत नाही असे त्या म्हणाल्या तेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी श्री महाराजांना बोलावून आणले. श्रीमहाराज म्हणाले,"बाई, हे देहाचे प्रारब्ध आहे ते सोसले पाहिजे." यावर बाई म्हणाल्या की ते सोसवेल असे करा. श्रीमहाराज म्हणाले,"करतो, पण तीन दिवसांऐवजी सहा दिवस ताप येईल." त्या ठीक आहे म्हणाल्या आणि सहा दिवसांनी त्यांना बरे वाटू लागले!


- " होकायंत्राची सुई स्थिर व्हावी तसे नाम स्थिर झाले पाहिजे."

- "सगुणाचे फार महत्त्व आहे. तुम्ही ज्या देवतेची पूजा करता, त्या देवतेला पूजा घेण्याची सवय लागते."

- "एकदा श्रीमहाराजांना म्हणालो की ब्रह्मानंद महाराजांसारखे नामाचे प्रेम मला द्या. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले की ह्या एकाच जन्मात होणाऱ्या गोष्टी नाहीत."

- "वास्तविक पू. तात्यासाहेबांच्या मुखाने श्रीमहाराज बोलत. तरीदेखील एकदा श्रीमहाराज म्हणाले की त्याचे (पू. तात्यासाहेबांचे) साधन त्यालाच करावे लागेल."

- "श्रीमहाराज एकदा म्हणाले, नाम घेता आणि तीर्थयात्रेला जावं असं तुम्हाला वाटतं! भावार्थ असा की नामाने सर्व पापे नाहीशी होतात यावर तुमची श्रद्धा नाही आणि म्हणून तीर्थयात्रा कराव्यात असे तुम्हाला वाटते."

- "नामात बदल होत नाही, बदल नाम घेणाऱ्यात होतो."

- "पैसे किती असावा? अन्नवस्त्राला कमी पडू नये आणि मेल्यावर वर्गणी गोळा करायला लागू नये."

- "येथे येणाऱ्या एका गृहस्थांच्या मुलीला अंगठा चोखायची सवय होती. लहान मुलांना ती असते पण मुले मोठी झाली की ती जाते. ह्या मुलीच्या बाबतीत मात्र लग्न झाल्यानंतरही ती आठवण आली की ती एका कोपऱ्यात बाजूला जाऊन अंगठा चोखून यायची! तसे नामाचे झाले पाहिजे."

- "श्रीमहाराज सांगत, साधन असे पाहिजे की डोळे मिटले की जग नाहीसे झाले पाहिजे."

- "भगवंताचे स्मरण ही कृती आहे. भगवंताचे विस्मरण ही वृत्ती आहे."

- "साधकाने आपल्या घरी पाहुण्यासारखे राहावे आणि त्याची पुढची पायरी म्हणजे मेल्यासारखे राहावे."

- "जपात लवकर प्रगती व्हायला काही प्रमाणात अनुवंशिकता उपयोगी पडते."

- "विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा ह्या तीन्हींमधे फरक आहे. दृश्यावर असतो तो विश्वास आणि अदृश्यावर किंवा सूक्ष्मावर असते ती श्रद्धा. श्रद्धा स्थिर झाली की तिला निष्ठा म्हणतात."

- "प्रारब्ध बदलणं हा गुन्हा आहे. मी ते सुसह्य करतो, टाळत नाही, असे श्रीमहाराज म्हणत."

- "भगवंत त्याच्या नामाच्या तीन संधी देतो. या संधीकालात घेतलेले नाम फार प्रभावी असते. पहिली संधी जन्माच्या वेळी, दुसरी लग्नाच्या वेळी आणि तीसरी मरताना. यातली पहिले संधी आपल्या हातात नाही, दुसरी हुकली आहे. आता तिसरी तरी चुकता काम नये म्हणून अखंड नाम टिकवण्याचा अभ्यास केला पाहिजे."

- "बिंबाचे सर्व गुणधर्म प्रतिबिंबाला जसेच्या तसे लागू होत नाहीत. तेवढाच फरक गुरु-शिष्य संबंधात असतो."

- "पू. तात्यासाहेब घरातून बाहेर गेले की तसबिरीतले महाराज थोडे म्लान दिसत. श्रीमहाराजांना (पेटीवर) विचारले तेव्हा ते म्हणाले, तसे काहीसे खरे आहे!"

- "झोपण्यापूर्वी नाम घ्यायची सवय लागली तरच मरणाच्या वेळी नाम येईल."

- "इतक्या लोकांवर प्रेम करायचं आणि इतक्या लोकांनी केलेलं प्रेम सहन करायचं हे फार कठीण आहे."

- "नाम घेताना पैशांच्या विचाराची नुसती लहर येऊन गेली तरी नामामध्ये बिघाड येतो."

- "श्रीमहाराज म्हणाले, तुमचा पैसे नाहीसा होणे ही माझी कृपा आहे. ही कृपा कोणाला पाहिजे?"

- "साधनात खरा त्रास होतो तो संशयाचा. संशय जाता जात नाहीत."

- "डोळे मिटून समाधी काय कामाची, डोळे उघडे ठेऊन समाधी पाहिजे."

- "आस, हव्यास आणि ध्यास ह्या साधनाच्या तीन पायऱ्या आहेत. आस म्हणजे भागवत्प्राप्तीची तीव्र इच्छा. हव्यासात केवळ तीच एक इच्छा राहते आणि ध्यासात त्याच्याखेरीज दुसरे काही सुचेनासे होते."

- "काही बोलताना किंवा करताना हे श्रीमहाराजांना आवडेल का असा विचार करूनच बोलावे, करावे. मी हे आचरणात आणले आणि याचा मला खूप फायदा झाला."

- "गुरु विश्वाच्या नियमात बसत नाही. विश्वाच्या नियमांचे त्याला बंधन नसते."

- "प्रपंचात आपण कितीतरी वेळा लाचार होतो. तसे लाचार होऊन श्रीमहाराजांना प्रार्थना करावी."

- "श्रीमहाराज मला म्हणाले की कमी दिवसांचं मूळ जसं कापसात ठेऊन सांभाळतात तशी मी लोकांची अंतःकरणं सांभाळली."

- "श्रीमहाराज म्हणाले होते की कोल्हापूरचे श्री अंबाबाईचे मंदिर, नाशिकचे काळाराम मंदिर आणि पंढरपूरचा विठ्ठल ही जागृत देवस्थाने आहेत."

- "गोंदवल्याला हा प्रभाव आणखी शंभर वर्षे राहील असे श्रीमहाराज म्हणाले होते."

- "निळा प्रकाश ज्ञानाचा तर पांढरा भक्तीचा आहे."

- "नामस्मरण करताना मला एकदा काळा रंग दिसू लागला. त्यासंबंधी श्रीमहाराजांना सांगितल्यावर ते म्हणाले, आपले पूर्वीचे पाप आपल्याला त्या रंगात दिसते."

- "देह म्हणजेच अन्नमय कोश. अन्नमय कोशाचे अन्न धान्य, वनस्पती इ. आहे. सूक्ष्म शरीराचे एकाहून एक सूक्ष्म असे तीन कोशआहेत. प्राणमय कोशाचे अंग हालचाल हे असून विकार हा त्याचा आहार आहे. मनोमय कोशाचे मन हे अंग असून विचार हा त्याचा आहार आहे. विचार शब्दांनी चालतात म्हणून त्या मनाला नामात गुंतवून ठेवले तर ते व त्याच्या बाहेरचे दोन्ही कोश - अन्नमय आणि प्राणमय - ताब्यात येतात. ध्यान हे विज्ञानमय कोशाचे अंग असून आनंदमय कोशात समाधी आहे."

- "आरती म्हणजे आर्त होऊन मारलेली हाक."

- "त्या बाई सांगत होत्या की रोज रात्री नाम मला नाम घेण्यासाठी उठवते. बाई खऱ्या श्रद्धावान आहेत. आपल्याला ही काही विशेष अवस्था आली आहे ही भावनाच त्यांना नाही. ही साधी शुद्ध अंतःकरणाची माणसेच परमार्थात जलद वाटचाल करतात."

- "रोग औषधांनी बरा होत नाही, तो प्रारब्धाने बरा होतो. औषधांनी आजाराचा भार कमी होतो असे श्रीमहाराज म्हणत. औषधांइतकाच आहारातील बदल आणि समतोलपणा महत्वाचा आहे."

- "सत्पुरुषाच्या घरच्या अन्नात विशेष शक्ती असते. त्यामुळे तुम्ही जो भाव ठेऊन त्याच्याकडे जाल तो भाव पुष्ट होतो. तुम्हाला जर संसाराचे प्रेम असेल तर त्या अन्नामुळे तो भाव पुष्ट होईल."

- "घामाला सुगंध येणे ही शरीरातील पृथ्वीतत्त्व शुद्ध होत चालल्याची खूणआहे."

- "श्रीमहाराजांचे अस्तित्व देहाने, विचाराने आणि नामात असे तीन प्रकारे जाणवू शकते."

- "ब्रह्मानंद महाराजांकडे श्रीविरुपाक्ष नावाचे एक गृहस्थ होते. ते उग्र देवीचा जप करीत. त्याचा परिणामः होऊन ते उग्र बनले. ज्या देवतेचा जप करावा तिचे गुण अंगी येतात."

- "रोज दहा हजार जप केला तरी साडेतीन कोटीला अंदाजे दहा वर्षे लागतील."

- "साधन थांबणे म्हणजे विधवा होण्यासारखे आहे."

- "अनुभव प्रथम देहकाशात, नंतर चित्ताकाशात आणि शेवटी चिदाकाशात येतात."

- " मोटार उतरणीला लागली की इंजिन बंद करतात तरी ती आपोआप वेगाने खाली घसरते. तसे नाम घेता घेता, घेणारा थांबला तरी नाम प्रयत्नरहित चालू राहते. असे नाम होऊ लागले कि समजावे की काळाच्या पलीकडे जाण्यासाठी आवश्यक तो परवाना आपल्या हाती आला आहे."

- "गुरु, आपले साधन, देवता इत्यादींची स्वप्ने पडू लागली की ओळखावे गाडी नीट रस्त्यावर आहे."

- "अखबार मत पढो, असे नारायणस्वामींनी म्हटले आहे ते खरे आहे. कृष्णप्रेमनेही जवळ जवळ चार वर्षानंतर वर्तमानपत्र उघडले आणि ते म्हणाले की जग पूर्वीसारखेच चालले आहे! भ्रष्ट पुढाऱ्यांचे आचरण वाचून आपले मन गढूळ होते आणि साधनावर त्याचा परिणाम होतो.

"
   आजारपणामुळे क्षीण होत जाऊन ३ जानेवारी १९९८ रोजी पू. बाबांनी देह ठेवला. देह ठेवण्याच्या दोन दिवस अगोदर त्यांनी सांगितलेला हा प्रसंग:
  "गोंदवल्याहून परतताना मला श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी समाधीपाशी नेले ना, तुम्ही नव्हतात नाही का तेव्हा! त्यावेळी मी श्रीमहाराजांची प्रार्थना केली बघ - 'महाराज, आजपर्यंत आपला निरोप मी जर प्रामाणिकपणे जसाच्या तास लोकांपर्यंत पोहोचवला असेल तर मला आपण त्याची काहीतरी प्रचिती द्या.' आणि बघ, समाधीतून तेजस्वी असा निळा प्रकाशाचा झोतच्या झोत बाहेर पडला व सर्व गर्भागार त्या प्रकाशाने भरून गेले. त्या तेजाने काही वेळ माझे भान हरपले व शरीरावरील ताबा गेला. मग मी भानावर आलो. बाळांनो, तुम्ही कधीही श्रीमहाराजांना सोडू नका."

       ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।